मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं वेगळीच छाप उमटवली आहे. ‘लाडका दादूस’ म्हणून त्यांची चांगलीच लोकप्रियता आहे. अरुण कदम यांनी आजवर अनेक रिअॅलिटी शोजमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे.
आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारे अरुण कदम हे सोशल मीडियाद्वारेही तितकेच चर्चेत राहत असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. तर कधी ते त्यांच्या लाडक्या नातवाचे काही मजेशीर व्हिडीओही शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. अशातच अरुण कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अरुण कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अन्नदान सेवा करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. टाटा हॉस्पिटलच्या बाहेरील गरजू पेशंटना अन्नदान करतानाचा हा व्हिडीओ आहे. यांमध्ये अरुण कदम हे स्वत: अन्नदान करताना पाहायला मिळत आहे. टाटा हॉस्पिटलच्या बाहेरील गरजू पेशेंट्सना ठाणे व परेलमधील पोलिस मित्र यांच्या तर्फे मोफत जेवण सेवा देत असताना अरुण कदम यांनी आपला सहभागही दर्शवला आहे. अरुण कदम यांच्या या अन्नदान सेवेनंतर त्यांना श्री स्वामी समर्थ यांची एक प्रतिमा देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला.
दरम्यान, अरुण कदम यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कृतीचे कौतुक होत आहे. अरुण कदम यांच्या या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दर्शवला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत अरुण कदम यांचे तोंडभरुन कौतुकदेखील केले आहे.