मराठी चित्रपटसृष्टीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ म्हणून प्रिया बापट व उमेश कामत ही जोडी प्रसिद्ध आहे. प्रिया व उमेश या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या दोघांनीही त्यांच्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दोघेही चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ट्रेंडिंग रिल्स, फोटोशूट करत चाहत्यांना भूरळ घालतात.(Priya bapat told about umesh kamat)
या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायला आवडते. दहा वर्षांपूर्वी प्रिया व उमेश यांनी ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक केलं होतं. आता ते ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. सुबोध भावे यांच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात प्रियाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात प्रियाने मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या नात्याबद्दल गंमतीशीर किस्से सांगितले. “तुम्ही बरेचदा नवरा-बायको म्हणूनच रंगभूमीवर किंवा स्क्रीनवर एकत्र काम केलं आहे. तर असं कधी होतं का, की घरात तुमचं कडाक्याचं भांडण झालं आणि सेटवर शूटिंगदरम्यान तुम्हाला रोमँटिक सीन करायचा आहे” असा प्रश्न सुबोधने विचारला.
यावर प्रिया म्हणाली, ”हो होतं असं, करोनामध्ये वेबसीरिजच्या प्रमोशन दरम्यान आमची खूप जोरदार भांडण झाली होती. एकमेकांचं तोंडही आम्ही बघत नव्हतो. तेव्हा आमचा ऑनलाईन इंटरव्ह्यू होता आणि त्यातही आम्हाला असाच प्रश्न विचारण्यात आला होता. भांडण झाल्यावर तुम्ही कसे मॅच करता? तेव्हा मी म्हणाले आम्ही आता कसे दिसतोय अगदी तसंच आमची भांडण घरी ठेऊन आम्ही स्क्रीनवर व्यवस्थित असतो. नाटकाच्या प्रयोगात आमची बरीच भांडण मिटली आहेत. ‘नवा गाडी नवं राज्य’ या नाटकाच्या आधी आमची जोरदार भांडण झाली होती. पण सीनमध्ये आम्हाला मिठी मारायची होती. मग काय संपलं भांडण”.
प्रिया व उमेश या दोघांनीही त्यांच्या अभिनयाच्या कौशल्यावर त्यांचा स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला. अनेक चित्रपटात या जोडीने नवरा-बायकोची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्रियाच्या ‘The City of Dreams’ या हिंदी वेबसीरिजला तर प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.