छोट्या पडद्यावर स्त्री पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे अली असगर. ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’, ‘द कपिल शर्मा शो’ सारख्या शोमध्ये अलीने उत्तमोत्तम काम केलं. त्याची लोकप्रियता यशाच्या शिखरावर पोहोचली. शोमध्ये त्याने साकारलेली स्त्री पात्र प्रचंड गाजली. मात्र स्त्री वेशात पडद्यावर वावरणं काही काळानंतर त्याला नकोसं वाटू लागलं. पुरेसा पैसा, प्रसिद्धी मिळत असतानाही अलीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याने स्त्री पात्र न साकारण्याचा निर्मय णय घेतला. ‘कॉमेडी सर्कस’च्या २६ एपिसोडपैकी १८ ते १९ एपिसोडमध्ये त्याने फक्त स्त्री पात्र साकारलं. मात्र त्याला हे काम मनापासून आवडत नव्हतं. याचबाबत त्याने आता एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Ali aslgar says no to female roles)
‘द कपिल शर्मा’ शो सोडण्यावरुन अली म्हणाला, “त्या शोमधील माझी भूमिका चालतच नव्हती. मी एकाच ठिकाणी अडकलो होतो. मीच काम एन्जॉय करत नाही तर भूमिका तरी कशी उठून दिसणार? हा विचार माझ्या मनात डोकावला. जी भूमिका मी उभारली ती कायमची संपवण्यापेक्षा शोच सोडण्याचा निर्णय घेतला. थोडे दिवस ब्रेक घेऊन पुन्हा पुनरागमन करण्याचा मी विचार केला. हाच विचार करुन मी कपिलचा शो सोडला. दादी, नानी दोन्हीही एकसारखेच होते. डान्स, किस, दारू सगळं काही यासाठी मी वापरलं. मला तिथे राहून फक्त पैसे कमावयचे नव्हते. म्हणून शो सोडण्याचा मी निर्णय घेतला.
आणखी वाचा – “मला काय झालं तर कोण बघणार?”, ७९व्या वर्षीही एकट्याच राहतात उषा नाडकर्णी, परिस्थिती सांगताना रडू कोसळलं अन्…
पुढे तो म्हणाला, “कॉमेडी सर्कस करत असताना मी क्रॉस ड्रेसिंग परफॉर्मन्स करत होतो. त्यावेळी माझ्या मुलांनाही शाळेत त्रास दिला जायचा. माझ्या भूमिकेमुळे त्यांनाही त्रास होत होता. तेव्हाही मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. जवळपास नऊ महिने मी घरातच होतो. कारण स्त्री व्यक्तीरेखेसाठी मी नकार देत होतो. मी स्त्रीच्या वेशातच शूट करत होतो. माझी मुलं शाळा शिकत होते. यावेळी दुसरी मुलं त्यांची खिल्ली उडवायचे. तेव्हा माझ्या मुलांनी मला विचारलं की, बाबा तुम्हाला दुसरं काहीच येत नाही का?. तेव्हा मला खूप धक्का बसला. स्त्री पात्र करणं बंद केलं पाहिजे ही जाणीव मला तेव्हा झाली”.
अलीने स्त्री पात्र करण्यावरुन अनेक खुलासे केले. तो म्हणाला, “एक वेळ अशी होती की, लेखक माझ्यासाठी फक्त स्त्री पात्रच लिहायचे. अलीच स्त्री पात्र करणार हे त्यांच्या डोक्यात कोरलं गेलं होतं. पुरस्कार सोहळा, शोमध्येही मला स्त्री पात्रच करण्यास बोललं जायचं. त्यामुळे आठवड्यातील सात दिवसांपैकी चार दिवस मी स्त्री वेशातच असायचो. पैसे खूप चांगले मिळत होते. पण त्या कामातून मला समाधान मिळत नव्हतं. स्त्री पात्राची कामं येत होती पण मी सगळ्या भूमिका नाकारतच गेलो”. अलीचं विशेष कौतुक कारण कोणत्या कामात जास्त समाधान मिळत आहे हे त्याने जाणून घेत निर्णय घेतला.