गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘७२ हुरें’ या सिनेमाचा ट्रेलर सेन्सॉर बोर्डाने रिजेक्ट केल्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. बोर्डाने याआधी सिनेमाला मंजुरी दिली होती, मात्र ट्रेलर रिजेक्ट केल्याने सिनेमाचे निर्माते चांगलेच संतापले असून त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.(72 Hoorain Controversy)
सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयामुळे ‘७२ हुरें’चे सहनिर्माते असलेले अशोक पंडित यांनी सेन्सॉर बोर्डावर टीका केली. ते म्हणाले, ‘७२ हुरें’च्या ट्रेलरमधील व्हिज्युअल्स हे सिनेमातून घेतले असताना तो बोर्डाने कोणत्या आधारावर रिजेक्ट केला आहे. आम्ही ट्रेलर लाँचसाठी पूर्ण तयारी केली होती, थिएटरही बुक केले होते. मात्र अचानक आमच्यावर बॉम्ब पडला आणि आम्ही ट्रेलरला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले, हे आमच्यासाठी धक्कादायक होते. मी सेन्सॉर बोर्डाला एक प्रश्न विचारू इच्छितो की, ज्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, ज्याचं सरकारने कौतुक केलं आहे. त्याच सिनेमावरून हा ट्रेलर तयार करण्यात आला, तरी त्याला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास काय अडचण आहे ?”

पुढे निर्माते अशोक पंडित म्हणाले, “कोण हे लोक आहेत ज्यांनी ट्रेलरला सेन्सॉर प्रमाणपत्र दिलेले नाही. तुम्ही हे कोणत्या हेतूने आमचा ट्रेलर तुम्ही रिजेक्ट केला आहे ? कोणत्या कारणास्तव केला, हे आम्हाला समजावून सांगा. ज्या सिनेमाला तुम्ही सेन्सॉर प्रमाणपत्र दिलं, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, त्याच सिनेमातील दृश्यांवरून हा ट्रेलर तयार करण्यात आल्याचा निर्मात्यांचा दावा असल्याचे म्हणत ही काय दादागिरी आहे ? असा सवाल त्यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना केला आहे.
दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने रिजेक्ट केल्यानंतरही सिनेमाच्या निर्मात्यांनी याचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केला असून ७ जुलै रोजी ‘७२ हुरें’ सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.(72 Hoorain Controversy)