मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी आणि या कलाकारांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना कायमच रस असतो. त्यात या कलाकारांच्या लग्नासाठीही अनेक चाहते उत्सुक असतात. अशीच टेलिव्हिजन विश्वात एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिच्या लग्नाची तिच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून राहिलेली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली अर्थात जुई गडकरी. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला याआधी अनेकदा लग्नाबद्दल विचारलं आहे. “लग्न कधी करणार? कुणाबरोबर करणार?” अशा प्रश्नांसह काही चाहत्यांनी तर तिला लग्नासाठी मागणीही घातली आहे. याबद्दल जुईने अनेकदा भाष्यही केलं आहे. अशातच आता तिने तिला कसा जोडीदार हवा आहे याबद्दल सांगितलं आहे. (jui gadkari on her partner)
सोशल मीडियावर अभिनेत्री जुई गडकरीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त ती वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरील धमाल-मस्तीही ती व्हिडीओद्वारे शेअर करताना दिसते. अशातच तिने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला आणि या संवादात तिने तिच्या जोडीदाराबद्दल भाष्य केलं आहे. तसंच ती जुन्या काळातली असून तिला खर्चीक गोष्टी आवडत नाहीत, याबद्दलही तिने सांगितले. मालिकेत नुकताच अर्जुनने सायलीला बस स्टँडवर प्रपोज केल्याचा सीन पाहायला मिळाला. यावरुनच जुईला तिच्या जोडीदाराने कसं प्रपोज केलेलं आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला.
याबद्दल जुई गडकरी असं म्हणाली की, “लग्नाबद्दलची माझी अशी काही फार रम्यक कल्पना नाही. पण मला सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटेल की, प्रपोज न करताही जर एकमेकांच्या भावना कळल्या तर खूप चांगलं. पण अगदी साध्या व सोप्या पद्धतीने गोष्टी झाल्या तर मला आवडेल. एखादे नाते मैत्रीतून पुढे गेलं तर खूप चांगलं असतं असं मला वाटतं. त्यातूनच एकमेकांचे स्वभाव कळलेले असतात. त्यामुळे कळून जातं की, प्रेम आहे वगैरे. त्यामुळे मला औपचारिकता म्हणून प्रपोज करण्याची वगैरे गरज नाही”.
यापुढे जुईने स्वत:च्या लग्नाबद्दल असं म्हटलं की, “सेटवर मला सगळेजण लग्नासाठी प्रेरित करतात. हे वर्ष गेलं आता पुढचं वर्ष आलं. आता तरी लग्न कर असं म्हणतात. त्यामुळे बघू आता”. दरम्यान, जुई ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील तिची भूमिका चाहत्यांना भलतीच आवडते. त्यामुळे या मालिकेत तिच्या सीनसाठी चाहतेमंडळी चांगलेच उत्सुक आहेत.