jui gadkari new webseries : ‘पुढचं पाऊल’, ‘तुजवीण सख्या रे’, ‘वर्तुळ’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘सरस्वती’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी जुई गडकरी नेहमीच साऱ्यांच्या मनावर राज्य करते. सध्या जुई ‘ठरलं तर मग’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या मालिकेतील तिची सायली ही भूमिका रसिकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेशिवाय जुई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळाली आहे. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या जुई अभिनयासह मास्टर्सचे शिक्षणही घेत आहे. याबाबत ती सोशल मीडियावर शेअरही करते.
जुई आता अभिनयासह आणखी एक जबाबदारी निभावताना दिसणार आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. जुई गडकरीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असे सांगितले होते की, ती आजच्या दिवशी एक घोषणा करणार आहे. त्यानुसार तिने घटस्थापनेच्या दिवशी ही आनंदाची बातमी शेअर केली.

अभिनेत्री-गायिका म्हणून लोकप्रिय असणारी जुई आता ‘लेखिका’ म्हणूनही ओळखली जाणार आहे. तिने जाहीर केले की, ती आता एका नव्या वेब सीरिजसाठी लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत तिने पोस्ट शेअर करत म्हटलं की, तिच्या आगामी ‘अनसॉल्व्ह्ड’ या वेब सीरिजचा मुहूर्त पार पडला आहे. Unsolved च्या मुहूर्ताच्या क्लॅपर बोर्डचा फोटो शेअर करत जुईने लिहिले की, “लवकरच तुमच्या भेटीला येते आहे… वेब सीरिजची लेखिका म्हणून नवीन सुरुवात”.
कॉकटेल स्टुडिओजची निर्मिती असणाऱ्या या सीरिजचे दिग्दर्शन कुलदीप जाधव यांचे असून, झी5 वर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुईने या निर्मिती संस्थेचीच पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली असल्याने हे लक्षात आलं आहे. ज्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या या नव्या प्रोजेक्टसाठी प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.





