‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. जुईने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आता जुई ‘ठरलं तर मग’ मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. (Jui Gadkari On Health Update)
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचं प्रचंड मोठा चाहतावर्गही आहे.सोशल मीडियावरही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. जुईने तिच्या तब्येतीबाबत काही दिवसांपूर्वी अपडेट दिली होती. जुई सध्या आजारी असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं तिने शेअर केलेल्या पोस्टवरुन समोर आलं. या पोस्टमध्ये जुईने तिच्या हाताला आयव्ही लावलेला हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला होता. यानंतर आता जुईने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.
सेटवरील ऍक्शन मोड असलेला फोटो स्टोरीला पोस्ट करत तिने कामाला सुरुवात केली असल्याचं सांगितलं. यानंतर अभिनेत्रीने एक सेल्फी व्हिडीओही शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती हॉस्पिटलमधील रुग्णाच्या कपड्यांमध्ये दिसते आहे. मालिकेत सायलीचा अपघात झाल्याचे दाखवले आहे, त्यामुळे त्यानंतरचे शूटिंग ती हॉस्पिटलमध्ये करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत जुईने लिहिले की, “तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. हो, मी फुल्ल पॉवरने सेटवर परतले आहे”. या व्हिडीओमध्ये ‘ठरलं तर मग’ मालिकेचे शीर्षकगीतही ऐकू येत आहे. अभिनेत्रीने म्हटले की सेटवरील भावुक सीनदरम्यान मालिकेचे शीर्षकगीत वाजवण्यात आले होते. यानंतर जुईने एक फोटो शेअर करत स्टोरी पोस्ट केली आहे आणि या स्टोरीखाली “अफवांवर विश्वास ठेवू नका. शुटिंग वगैरे थांबलंय असं खोटं सांगू नका. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि लवकरच त्याबद्दल पोस्ट करेन. तोपर्यंत धीर धरा आणि प्रेम करत रहा”, असं लिहिलं आहे.