rohini hattangadi purna aaji : ‘ठरलं तर मग’ मालिका ही गेल्या अनेक वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका आहे. नेहमीच या मालिकेत रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळतात. अशातच मालिकेत आलेल्या एका मोठ्या ट्विस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये अखेर पूर्णा आजीची एंट्री झाली आहे. पूर्णा आजीच्या भूमिकेत यापूर्वी अभिनेत्री ज्योती चांदेकर दिसल्या, मात्र त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला. अर्थात त्यांची अशी मालिकेतील एक्झिट अनेकांना न पटणारी होती. यानंतर मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत कोण दिसणार याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. आणि अखेर पूर्णा आजीच्या भूमिकेत एंट्री झाली ती अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी.
रोहिणी हट्टंगडी यांनी मालिकेत पूर्णा आजी म्हणून एंट्री घेतली आहे. दोन एक वर्षांनी त्या पुन्हा मालिकाविश्वात परतल्या आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आता रोहिणी या ठरलं तर मग मध्ये दिसणार आहेत. यांत त्या किती काळ असणार आहेत, त्यांची भूमिका किती मोठी असणार आहे हे समोर आलेलं नाही. याबाबत आता रोहिणी यांनीच याचा खुलासा केला आहे. ‘इट्स मज्जा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत रोहिणी यांनी त्यांच्या टेलिव्हिजनमध्ये परतण्याबाबत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – अखेर ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजी परतल्या, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार ही भूमिका, पहिला फोटो समोर
रोहिणी यांना नंबर वन मालिकेत काम करायला मिळालेल्या संधीबाबत बोलताना रोहिणी ताई म्हणाल्या, “नंबर वन मालिकेत काम करताना मला बरं वाटतंय. मध्यंतरी असं झालं होतं की माझ्या हेल्थमुळे नाही होत आहे, जरा आपण स्लो डाऊन व्हावं असं वाटलं. त्यामुळे मी फक्त सांगितलं होतं की, मला रनिंग रोल देऊ नका जसं की सबंध मालिकाभर मी आहे, जसं की कॅमिओ दिला तर मी आहे, मी थोडंसं अनाऊन्स केल्यासारखं झालं. कारण एक दोघांनी मला सांगितलं होतं की, रनिंग रोल मला देऊ नका मी कॅमिओ करेल. चार-पाच वा दोन-तीन महिन्याचा असेल तर”.
पुढे त्या म्हणाल्या, “आता इथेही बघायचं मला कसं झेपतंय ते. कारण मला वाटतं मी दोन वर्ष चार चौघी हे नाटक केलं. त्याच्यामुळे टीव्हीशी संपर्क थोडासा तुटलेला होता. आणि तिथून पुन्हा इथे यायचं, आणि थोडीशी हेल्थही साथ देत नाही आहे आता या वयामध्ये, हे असं म्हणताना मला त्रास होतोय पण तरीसुद्धा”.





