‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळतेय. मालिकेच्या कथानकाने या मालिकेला विशेष पसंती मिळवून दिली आहे. मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक वळणही आलेली पाहायला मिळाली. विशेषतः सायलीला बऱ्याच अडचणींचा मालिकेत सामना करायला लागला असल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता सायलीचं कौतुक करणारा एक प्रोमो समोर आला आहे. (Tharal Tar Mag New Promo)
‘ठरलं तर मग’च्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेत लवकरच महीपत शिखरेचा पर्दाफाश होणार आहे. साक्षी व महीपतने केलेले गुन्हे कोर्टासमोर येणार असल्याचं मालिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या मालिकेत अर्जुन सायलीला महिपतच्या तावडीतून सोडवून घरी घेऊन येतो. आणि त्यांनतर ते महिपतविरुद्ध पुरावे शोधताना दिसत आहेत. सायली अर्जुनला संतोषने दिलेल्या पेन ड्राइव्हबद्दल सांगते. या पेन ड्राइव्हमध्ये महिपतविरोधात पुरावे व कॉल रेकॉर्डिंग्स असतात. मात्र सायली तो पेनड्राइव्ह चैतन्यच्या गाडीतील बॅगमध्ये लपवते. त्यामुळे दोघेही चैतन्यचा पाठलाग करतात.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अर्जुनच्या वडिलांवर दाखल झालेल्या गुन्ह्याविरुद्ध न्यालयात सुनावणी होणार असते. या भागात अर्जुन, सायली, सुभेदार कुटुंब, महिपत, साक्षी न्यायालयात हजर झालेले पाहायला मिळत आहेत. न्यायाधीश न्यायालयात सुनावणीच्या वेळी म्हणतात, “महिपत शिखरे यांना अमली पदार्थांची तस्करी या गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा सुनावत आहे” या सुनावणीनंतर पोलीस महिपतला बेड्या घालतात आणि अटक करतात.
अर्जुनच्या वडिलांवरचा गुन्हा सायलीने खोडून काढल्याने प्रताप सुभेदारही स्वतः सायलीचे आभार मानतात. “सुभेदारांची सून म्हणून नावाला जागली ही मुलगी, थॅंक यू सायली”, असं ते म्हणताना दिसत आहेत. घडल्या प्रकरणावेळी पूर्णा आजीही तिथे असतात. सायलीची ही कामगिरी पाहून पूर्णा आजी आता तरी सायलीचा सून म्हणून स्वीकार करणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.