मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. इथे अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होतात. लहान पडद्यावरील अनेक कलाकार हे मुंबईबाहेरील आहेत. त्यांनी मुंबईमध्ये येऊन आपली अनेक स्वप्न साकार केली आहेत. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे पारुल चौहान. उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या पारुलने मुंबईमध्ये येऊन आपले अभिनयात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ती यशस्वीही झाली. नुकताच तिचा उत्तर प्रदेशमधील सामान्य घरातील मुलगी ते लहान पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री असा प्रवास समोर आला आहे. (actress parul chauhan struggle )
लहान पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘सपना बाबुल का…बिदाई’ या मालिकेने खूप नाव कमावले. या मालिकेमध्ये रागिणी हे पात्र ती साकारत होती. तिच्या भूमिकेचे खूप कौतुकही केले गेले. पण तिचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. ‘वो रहनेवाली महलो की’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २००५ साली ती मुंबईमध्ये दाखल झाली आणि चांगली मालिका मिळवण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली होती.
पारुलने एका मुलाखतीमध्ये मुंबईतील तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. ती म्हणाली की, “अभिनेत्री बनण्यासाठी नक्की काय करावं लागत याबद्दल मला काही कल्पना नव्हती.माझ्यासाठी हे काम शिकण्यासारखं होतं. यामुळे माझं आयुष्यदेखील पूर्ण बदललं आणि मला खूप शिकायलादेखील मिळालं”. पुढे ती म्हणाली की, “ ‘बिदाई’ या मालिकेमुळे मला मोठा ब्रेक मिळाला. ज्यांना वाटायचे की मी काहीही करु शकत नाही त्यांना मी चुकीचं ठरवलं. या मालिकेमुळे माझं पूर्ण आयुष्य बदललं. मला यश मिळाले तशी मी मजबूत झाले”.
तिने आपल्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल सांगताना म्हणाली की, “मुंबईत आल्यानंतर मी सुरुवातीचे चार महीने हॉस्टेलमध्ये राहिले. त्यावेळी एक डबा यायचा तो मी दोन वेळ खात असे. त्यामध्ये केवळ चार चपात्या असायच्या. हे खाऊन मी दिवस काढले”.
पारुलला अनेकदा तिच्या रंगरुपावररुनही बोलले गेले. त्याबद्दल तिने सांगितले की, “ एक अशी वेळ होती ज्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला. माझ्या शरीरात खूप हार्मोन्स बदल होत होते. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर खूप मुरमं आली होती आणि मी खूप जास्त बारीक झाले होते. मी मिळेल त्या डॉक्टरांकडे जाऊ लागले. त्यांचे सल्ले घेऊ लागले. त्यावेळी मला माझा चेहरा दाखवण्याची अजिबात इच्छा होत नव्हती”. अभिनयक्षेत्रात येण्यासाठी तिच्या आई-वडिलांनीदेखील तिला खूप पाठिंबा दिल्याचेही तिने सांगितले आहे.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती ‘मिलके भी हम ना मिले’ या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसत आहे.