मराठी सिनेविश्वात एक धक्कादायक बातमी समोर आली. मालिकाविश्वात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बाजू सांभाळणाऱ्या गौरव काशिदे याच्या मृत्यूची. गौरवने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी भीषण अपघातात जीव गमावला. वांद्रे येथे गौरवच्या बाईकचा अपघात झाला. यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र त्याचवेळी त्याला उचारासाठी इस्पितळात दाखल कऱण्यात आले. अनेक दिवस तो कोमामध्येही होता. अखेर गौरवची मृत्यूशी असलेली झुंज काल अपयशी ठरली. सध्या गौरव ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होता. (Jui gadkari Emotional Post)
अशातच ‘ठरलं तर मग’ मालिकेतील जुई गडकरीने गौरवच्या मृत्यूनंतर एक भावुक पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. ही पोस्ट शेअर करत जुई म्हणाली, “आमचं युनिट जॅाईन केल्यावर ताई मला कोणी उठवलंच नाही म्हणुन यायला उशीर झाला हे त्याचं पहिलं वाक्य होतं. पहिल्याच दिवशी उशिरा आला होता तो आणि मग हळुहळू रुळत गेला. मालिकेतील सीनचे प्रश्न देताना जर ते पात्र पळत आलेलं असेल तर तो पळुन पण दाखवायचा. हुशार होता. मला रोजचे सीन उलगडून सांगायचं. हसतमुख होता. मेहनती होता. त्या वयात मुलं असतात तसा अल्हडपण होता. मला थोडा घाबरायचा म्हणुन ताईसमोर धूम्रपान करुन गेलं की ताई लगेच ओळखते आणि ओरडते त्यापेक्षा नाही करत धूम्रपान, असं म्हणुन निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा.
आणखी वाचा – मालिकाविश्वातील ‘या’ सहाय्यक दिग्दर्शकाने अपघातात गमावला जीव, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
पुढे तिने लिहिलं आहे की, “गुणी मुलगा होता. रात्री घरी जाताना आमच्या दुसऱ्या एका महिला AD ला आणि hair dresser ला घरी सोडुन जायचा. त्या ही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडुन पुढे गेला. त्यादिवशी नेमकी आमची hairdresser चारकोपलाच उतरली. नाही तर ती रोज त्याच्याबरोबर माहिमपर्यंत जायची आणि तो तिला न्यायचं असायचं म्हणुन गाडी सांभाळुन चालवायचा. त्याचा २४वा वाढदिवस होता १०जुनला. नऊ तारखेला त्याच्या बाईकचं वांद्रे येथे भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता. त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता. पण सगळ्यांशी त्याने छान नातं जोडलं होतं. गेले अनेक दिवस तो कोमामध्ये होता आणि काल त्याची मृत्युशी असलेली झुंज अखेर संपली”.
“सेटवर सगळे अजूनही सुन्न आहेत. सगळ्यांना वाटत होतं गौरव परत येईल. गौरव, कालपण तुला कोणीतरी ऊठवायला हवं होतं रे. तु उशिरा आला असतास पण आला तरी असतास. तुझ्या आत्म्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं?, त्या आई-बाबांचं आज काय झालं असेल याचा विचारही करु शकत नाही
देव त्यांना बळ देओ. गौरव काशिदे. तुला आम्ही नेहमी मिस करु”, असंही ती म्हणाली आहे.