अभिनेत्री जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून ती दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली या भूमिकेमुळे जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेशिवाय जुईने आणखी बऱ्याच मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांमध्ये लाडकी असलेली जुई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. (Jui Gadkari Angry On Fans)
जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय जुई अभिनयासह सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते आणि प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. परंतू अशातच आता जुईने नूकतीच तिच्या सोशल मीडिया अकांउटवर एक स्टोरी शेअर केली आहे. जुईने शेअर केलेल्या या स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्टोरीमध्ये तिला चक्क धमकी देण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे. चाहतीने दिलेल्या या धमकीला जुईने सडेतोड उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा – दिशाचा डाव फसला, पारूला शुद्ध आली, अहिल्यादेवींमुळे वाचला जीव, आदित्यला अश्रू अनावर अन्…
जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहतीच्या कमेंटची एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिच्या चाहतीने आरोप करत असं म्हटलं की, “काय गं. तुला खूप माज आला आहे का?, तुला आम्ही फॉलो करायचं आणि तू आम्हाला फॉलो करायचं नाही असं का. आताच्या आता तू आम्हाला फॉलो कर. सपना पांचाळ, राखी सुतार, करुणा विन्हेरकर, यश विन्हेरकर यांना तू फॉलो कर. नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण आम्हाला वाटलं होतं तू आम्हाला फॉलो करशील पण तू तसं केलं नाहीस. मी तुला पोलिसात देईन. मी उद्याच्या उद्या तुझ्या गावी कर्जतला येते. कुठेही पळायचं नाही”, असं म्हणत फॉलो न केल्याने पोलिसांत देईल अशी भाषा चाहतीने वापरली आहे.
जुईने ही पोस्ट शेअर करत, “हे सहन केलं जाणार नाही, आधीच सांगते. मग आपण थेट पोलीस स्टेशनला भेटू. राखी सुतार तू फेमस झालीस. ये कर्जतला मी बघतेच”, असं म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे.