Aditi Dravid struggle : असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करतात. अशी बरीच मंडळी आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करत नवं पाऊल टाकलं. अभिनयावर असलेलं प्रेम, कलेवर असलेली श्रद्धा आणि अध्यात्म यावर असलेला विश्वास याने ही मंडळी कठीण काळावर मात करताना दिसली. असंच काहीस घडलेलं आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीसह. गेलं वर्ष तिच्यासाठी खूप कठीण होत, पण यातून ती बाहेर पडत अभिनयाची धुरा उत्तमरीत्या पेलवत आहेत. डिप्रेशनसारखा काळ ओलांडून आता ही आपली मैत्रीण तिचं नवंकोरं नाटकं घेऊन रंगमंच गाजवताना दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा अदिती द्रविड. अदिती अभिनायासह सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या अदिती ‘का रुसली रखुमाई’ या नाटकांतून समोर आली आहे.
अदितीने नुकतीच ‘मज्जा पिंक’च्या ‘मनातला देव’ या पॉडकास्टला हजेरी लावली. यावेळी अध्यात्म आणि त्याचा आयुष्यावर होणारा परिणाम याबाबत बऱ्याच गप्पा झाल्या. यावेळी बोलताना अदितीने गेलं वर्ष तिच्यासाठी अवघड असल्याचं सांगितलं. याचं स्पष्ट कारण तिने दिलं नसलं तरी या सगळ्यातून ती कशी बाहेर पडली, अध्यात्माने तिने या सगळ्यातून बाहेर पडायला कशी मदत केली यावर ती खुलेपणाने बोलली आहे.
आणखी वाचा – “स्वतःच्या मुलाला पायावर उभं का नाही केलं?”, कॉमेडियनचा थेट अमिताभ बच्चनला सवाल, रोस्ट करणं पडणार महागात?
कठीण काळाबाबत बोलताना अदिती म्हणाली, “या नाटकाची सहनिर्मिती, काव्यलेखन आणि प्रमुख भूमिका अशा बऱ्याच पैलूंवरती मी पाय ठेवून काम करतीये. आणि हे नाटक जेव्हा उभं राहायला लागलं, याची जेव्हा सुरुवात झाली, मागचं वर्ष हे माझ्यासाठी पर्सनली सगळ्यात अवघड वर्ष होतं इमोशनल फ्रंटवरती किंवा मेंटल हेल्थच्या फ्रंटवरती. आणि मी फारशी कधी यावर व्होकल झाले नाहीये, कारण स्वतःहून कधी तसं बोलण्याची वेळ नाही आली. पण तू आता मला तो प्रश्न विचारलास, त्यामुळे मी तुला जे ऑनेस्टली त्याच्यावरचं आहे ते तुला सांगावसं मला वाटतंय. सो मी खूपच माझ्या लोएस्ट मेंटल हेल्थ फेजमध्ये होते मागचं अख्खं वर्ष आणि त्याच काळात मला असं वाटतं माझ्याकडून आत्तापर्यंतचं माझं सगळ्यात चांगलं काम घडलंय आणि ते म्हणजे ‘का रुसली रखुमाई'”.
पुढे ती म्हणाली, “आणि ते माझ्याकडे येणं, ती कन्सेप्ट माझ्यातून येणं किंवा मला तसे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सहनिर्मिती मिळणं, ते अक्चुअली उभं राहणं नाटक, कारण आपण आजपर्यंत विठू माऊलीवर किंवा विठ्ठल-रुक्मिणीवर, रखुमाईवर भरपूर गोष्टी पाहिल्या आहेत, ऐकल्या आहेत. अनेक गोष्टी रंगमंचावरही आहेत, चित्रपट आहेत, पण ‘का रुसली रखुमाई’चं जे भाष्य आहे, हे नाटक जी बाजू उलगडतं ती बाजू कधीच कोणीच बघितलेली नाहीये. आणि ती आपल्याकडून घडणं एक कलाकृती म्हणून हे मला असं वाटतं की हा पांडुरंगाचा आशीर्वाद होता माझ्यावरती. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या दुःखातून खरं तर खूप पटकन बाहेर येऊ शकले. पटकन म्हणण्यापेक्षा इंटेन्सिटी त्याची कमी कदाचित झाली, कारण माझं मन इकडे रमलं किंवा मला तिथून ती आध्यात्मिक शक्ती मिळत राहिली”.





