Shailesh Lodha Father Passed Away : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता शैलेश लोढा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याचे वडील श्याम सिंह लोढा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जोधपूर येथील घरी त्यांच निधन झालं. शैलेशने वडिलांच्या निधनाची बातमी इंस्टाग्रामवर भावनिक पोस्टद्वारे शेअर करत दिली. पोस्टद्वारे, शैलेश लोढा यांनी त्यांच्या वडिलांबरोबर त्यांचे खोल नाते आणि त्यांच्या वडिलांचा त्यांच्या जीवनावर झालेला महत्त्वपूर्ण प्रभाव याविषयी भाष्य केले. वृत्तानुसार, श्याम हे गेल्या दीड महिन्यापासून आजारी होते आणि कुटुंबीयांच्या अथक प्रयत्नांनंतरही ते आजाराला बळी पडले. शैलेशने वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिले, “मी जो काही आहे ते तुमच्यामुळे. मी तुमची सावली आहे. आज, सूर्याने जग प्रकाशित केले असताना, माझ्या आयुष्यात अंधार होता. बाबा आम्हाला सोडून गेले”.
शैलेश लोढा यांनी त्यांचे दु:ख आणि शून्यता या पोस्टद्वारे शेअर केली. त्याने हे दुःख इतकं मोठं आहे की शब्दात त्याच्या वेदना पूर्णपणे व्यक्त करु शकत नसल्याचंही म्हटलं. जड अंतःकरणाने, शैलेश त्याच्या वडिलांना शेवटच्या वेळी ‘बबलू’ म्हणून हाक मारण्यास सांगतो, यावरुन त्यांच्यातील खोल बंध व प्रेम अधोरेखित होते. शैलेश लोढा यांच्या वडिलांवर जोधपूर येथील शिवांची गेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारल्यामुळे शैलेश यांना लोकप्रियता मिळाली. तथापि, निर्मात्यांशी त्याच्या सततच्या भांडणामुळे अभिनेत्याने शो सोडला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ १५ वर्षांपासून यशस्वीपणे सुरु आहे. या शोमध्ये दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारत आहेत. दिशा वाकाणीने दया ही भूमिका साकारली होती. मात्र, त्या आता या शोचा भाग नाहीत.