मराठीसह बॉलीवूडमध्ये अनेक वीरांच्या संघर्षावर चित्रपटांची निर्मिती होताना पाहायला मिळते. चित्रपटांच्या या यादीतील एक सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा या चित्रपटात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांची भूमिका साकारत असून या चित्रपटाचा मराठी भाषेतील ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. हिंदीसह मराठीमध्ये देखील या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. (Swatantrya Veer Savarkar Marathi Trailer)
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्वातंत्र्य भारतासाठी अहिंसावादी पद्धतीने सावरकर यांनी केलेले संघर्ष आणि या चळवळीत त्यांच्यासह असणाऱ्या सहकाऱ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात सावरकर यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडेने साकारली असून प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेसह दिग्दर्शन, निमिर्तीची धुरा देखील रणदीपने सांभाळली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट येत्या २२ मार्चपासून प्रदर्शित होणार असून हिंदीसह मराठीमध्ये देखील चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार. या चित्रपटाबाबत यापूर्वी अनेक वादविवाद निर्माण झाले होते. या आधी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते परंतु त्यांच्यातील आणि रणदीपमधील वादामुळे महेश यांनी चित्रपटातून माघार घेतल्याच सांगण्यात आलं महेश मांजरेकर यांनी एक मुलाखतीत “रणदीपला कथानकातील काही मुद्द्यांवर आक्षेप होते. याबद्दल त्याने मला सांगितलं तेव्हा मी म्हणालो, की आता काही बदल केले तर चित्रपटात अडचण येईल. यावर तो म्हणाला, एकदा का स्क्रिप्ट फायनल झाली की मी कोणताच प्रश्न करणार नाही”. यावरून महेश यांना जाणवलं होतं की, रणदीपला त्याच्या डोक्यातील गोष्टी चित्रपटात आणायच्या होत्या. (Swatantrya Veer Savarkar Marathi Trailer)
या चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर पुढे म्हणाले होते की “मी प्रार्थना करतो की त्यांनी एक उत्तम चित्रपट तयार केला आहे. आम्ही भारतीय इतिहासाचे खूप खराब विद्यार्थी आहोत. रणदीपला या चित्रपटात लोकमान्य टिळकांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी जगवणार आहे’ याचा देखील समावेश करायचा आहे. हे सर्व सावरकरांच्या जीवनपटाला कसे लागू होईल हा मुळात प्रश्न मला पडला आहे. सावरकरांवर बायोपिक बनवायला हवं असं माझं म्हणणं होतं. चित्रपटात आपला मूळ हेतू सावरकर यांच्या आयुष्यकडे असणं अत्यंत आवश्यक आहे.”