दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांसह साऱ्यांनाच धक्का बसला. सुशांतच्या निधनाला आता चार वर्ष पूर्ण होतील. १४ जून २०२० रोजी सुशांतनं त्याच्या मुंबईतील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु आहे. मात्र त्याला तीन वर्षे होऊनही त्याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
सुशांतची बहीण श्वेता सिंग अजूनही त्याच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत असून अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अशातच त्याची बहीण भावाच्या आठवणीत केदारनाथला दर्शनासाठी पोहोचली. सुशांत शंकराचा भक्त असल्याने अनेकदा केदारनाथला जात असे. त्यामुळे सुशांतच्या आठवणीत त्याची बहीणही नुकतीच केदारनाथला गेली असून तिने याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सोशल मीडियावर सुशांतच्या बहिणीने त्याच्याबद्दलची आठवण शेअर करत असं म्हटलं आहे की, “चार वर्षांपूर्वी जून महिन्याच्या १४ तारखेला आम्ही आमचा लाडका सुशांत गमावला. आताही, त्या दुःखद दिवशी काय घडले याची उत्तरे आम्ही शोधत आहोत. मी केदारनाथला प्रार्थना करण्यासाठी, स्मरणासाठी आणि माझ्या भावाशी जवळीक साधण्यासाठी आले. हा दिवस माझ्यासाठी खूपच भावनिक होता; केदारनाथला उतरताच अश्रू वाहू लागले. मी थोडावेळ चालले पण शेवटी खाली बसून मनातून मला रडावे लागले. माझ्या आजूबाजूला मला सुशांतची उपस्थिती जाणवली. मला त्याला मिठी मारण्याची इच्छा वाटली. त्याने जिथे ध्यान केले होते तिथेच मीही बसले आणि ध्यान केले आणि त्या क्षणी, मला वाटले की तो अजूनही माझ्याबरोबर आहे, माझ्या आत आहे, माझ्याद्वारे तो अजूनही जगत आहे”.
आणखी वाचा – वधानंतरही विरोचक पुन्हा जीवंत, देवीआईच्या लेकींवर हल्ला करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा नवीन शक्ती बहाल?
यापुढे तिने असं म्हटलं की, “मला तिथे इंटरनेट कनेक्शन नव्हते. पण माझ्या कारमध्ये बसताना, मी इंस्टाग्राम बघितले आणि माझ्या इन्स्टाग्राममध्ये मी फक्त केदारनाथमध्ये साधूबरोबर सुशांतचा फोटो असलेली एक पोस्ट पाहिली. त्यामुळे मला त्या साधूंना भेटायचे होते आणि देवाच्या कृपेने मी त्यांना भेटू शकले. संदर्भासाठी मी ते यामध्ये सुशांतचा फोटो जोडत आहे आणि हे सगळं घडवून आणल्याबद्दल मी देवाचे आभार. मानते”.