Suraj Chavan Video : ‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिऍलिटी शोपैकी एक आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ या पर्वाचीही सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सूरज चव्हाणने विजेतेपद जिंकलं. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले असले तरी या शोची आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा अजूनही कमी होताना दिसत नाहीये. सूरज तर ‘बिग बॉस’नंतर अधिक चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात बारामतीकर सूरज चव्हाणने हवा केली. झापून झुपक स्टाईलने सूरजने संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली.
टिकटॉकमुळे सूरज सोशल मीडियावर चर्चेत आला. यानंतर तो रीलकडे वळला. सूरजला त्याचे काही व्हिडीओ पाहून सुरुवातीच्या काळात प्रचंड ट्रोल करायचे. पण, ‘बिग बॉस’मुळे हळुहळू सगळेजण त्याचे चाहते झाले. आई-वडिलांचं छत्र हरपलेला सूरज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आला आहे. सूरजच्या आत्याने व बहिणींनी त्याचा सांभाळ करत त्याला लहानाचा मोठा केला आहे. परिस्थितीमुळे सूरज त्याचे शिक्षणही घेऊ शकला नाही. त्यामुळे व्यवहार ज्ञानापासून तो फार दूर आहे.
आणखी वाचा – Video : मलायका अरोराच्या लेकाचं सावत्र आईवरही जीवापाड प्रेम, एकत्र क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
अशातच सूरजने नुकतीच वसेवाडी जवळच्या एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलांची भेट घेतली. सूरजला पाहण्यासाठी सर्व विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमा झाले होते. सूरजची एन्ट्री होताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सूरज सूरज अशी हाक देण्याबरोबरचं टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी सूरजचं स्वागत केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. यावेळी सूरजने सर्व मुलांना लाखमोलाचा सल्ला देत सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.
सूरजच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सूरज विद्यार्थ्यांना सल्ला देताना दिसतोय. यावेळी सूरज असं बोलताना दिसत आहे की, “काय मग बरंय ना? चांगलं शिकताय, अजून मोठं व्हायचंय. खूप शिक्षण घ्या. मला जमलं नाही शिक्षण घ्यायला पण, तुम्ही असं करु नका, खूप शिक्षण घ्या. खूप मोठे व्हा. मी कसा ‘बिग बॉस किंग’ झालो ‘झापुक झुपूक’ करुन तसे तुम्ही पण पुढे जा पण, शिक्षण घेऊन मोठे व्हा”. सूरजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.