बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली. या सीझनच्या पहिल्या भागात रणवीर सिंह व दीपिका पदुकोण ही क्युट जोडी आली होती. यावेळी दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल अनेक खुलासे केले होते. तसेच, तिने तिच्या अफेअरबद्दल बोलताना एक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे ती जोरदार ट्रोल झाली होती. आता या लोकप्रिय शोच्या नवीन भागात सनी देओल आणि बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये सनीने त्याच्या ‘गदर २’ चित्रपटाबद्दल बोलताना मोठा खुलासा केला आहे. (Sunny Deol talks about Gadar 2 movie clash with OMG 2)
सनी देओलचा ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा ‘OMG २’ गेल्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला होता. दोन्ही चित्रपटांना जरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी कमाईच्या बाबतीत ‘गदर २’ने ‘OMG २’ला मागे टाकले होते. सनीच्या ‘गदर २’ ने देशभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल ५२४ कोटींची कमाई करत एक विक्रम रचला होता. तर अक्षयच्या चित्रपटाने जवळपास १४० कोटींची कमाई केली होती. जरी या दोन्ही चित्रपटांना चांगलं यश मिळालं असलं, तरी या क्लॅशचा परिणाम दोघांना सहन करावा लागला. आता बऱ्याच महिन्यानंतर अभिनेत्याने दोन चित्रपटांच्या क्लॅशवर आणि अक्षय कुमारबद्दल बोलला आहे.
नुकतंच या शोचा नवीन भाग प्रसारित झाला. ज्यामध्ये तो अक्षय कुमारला त्याच्या ‘OMG २’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यासाठी फोन केला होता. सुरुवातीला करणने सनीच्या ‘गदर २’ चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आणि याबद्दल एक प्रश्न विचारला होता. त्यावर सनी म्हणाला की, “माझ्या चित्रपटासह दुसरा चित्रपट येऊ नये, असं मला मनापासून वाटत होतं. मात्र आपण यावर काहीही करू शकत नाही. ज्याचं आपल्याला दुःख होतं. नंतर मी विचार केला की, ‘जर या क्लॅशचा चित्रपटावर काही फरक पडणार नसेल, तर आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे.’ त्यावेळेस मला वाटायचं की, जर माझ्या चित्रपटाबरोबर एखादा चित्रपट आला नाही, तर तुम्हाला किमान चित्रपटगृहे तरी मिळतील.”
हे देखील वाचा – Video : राहुल देशपांडेंच्या लेकीचं इंग्रजी भाषेतील बोलणं ऐकून कलाकार मंडळीही भारावले, बोलताना थांबलीच नाही अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
पुढे तो अक्षय बरोबरच्या संवादाबद्दल बोलताना म्हणाला, “मी अक्षयला त्याचा चित्रपट पुढे ढकलण्याची विनंती केली होती. तेव्हा तो म्हणाला की, ११ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय माझा नाही, तर स्टुडिओचा आहे. आणि तसंही दोन चित्रपट एकत्र प्रदर्शित होतात. तेव्हा मी त्याला ठीक आहे. तुला शुभेच्छा देतो. फक्त मी विनंती करू शकतो, त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही.” सनीचा हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आलेलं आहे. सनीचा ‘गदर २’ चित्रपट २००१ मध्ये आलेल्या ‘गदर :एक प्रेमकथा’चा सिक्वेल होता. ज्यात त्याच्यासह अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा प्रमुख भूमिकेत होते.