छोटा पडदा गाजवल्यानंतर कलाकार मंडळी बरेचदा मोठ्या पडद्याकडे पाऊल टाकताना दिसतात. तर काही कलाकार मंडळी रंगभूमीवर आपली कला दाखवतात. रंगभूमीवर काम करण्याची आवड जोपासतात. यांत उदाहरण द्यायचं झाल्यास ओंकार भोजने, विशाखा सुभेदार ही नाव घेता येतील. आता त्यांच्या पाठोपाठ मराठमोळी व सर्व प्रेक्षक वर्गाची लाडकी सुंदरा आता मालिकाविश्वानंतर रंगभूमी कडे वळली आहे. (Akshaya Naik Entry On Theater)
अभिनेत्री अक्षया नाईक हिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यानंतर आता अक्षया रंगभूमीवर एन्ट्री करण्यास सज्ज झाली असून ती नाटकात मुख्य भूमिका साकरणार असल्याचं समोर आलं आहे . या नव्या कोऱ्या नाटकाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. असं असलं तरी अद्याप या नाटकाचं नाव मात्र गुपित ठेवण्यात आलं आहे. लवकरच रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाची निर्मिती ‘भूमिका थिएटर्स’ व ‘वाईड अँगल एन्टरटेन्मेंट’ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. या नाटकातील अक्षयाचा नवा लुक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून यांत अक्षयाचा मराठमोळा लूक पाहायला मिळतोय.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. या नाटकाचं खूप कौतुकही झालं होतं. प्रभावळकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला साधारणतः आता पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. मात्र हलकेफुलके असलेले हे नाटक आजही तितकेच ताजेतवाने आहे. नाटकाचे संगीतकार सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच आहे.
अक्षया नाईकने आजवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पहिल्याच मालिकेत आव्हानात्मक भूमिका साकारून तिने तिच्यातील अभिनयाची क्षमता दाखवून दिली. त्यामुळे अक्षया सशक्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. या नाटकातील तिच्या भूमिकेबद्दल तिला विचारले असता तिने अजुन थोड़ी प्रतीक्षा करावी, असे सांगितले. अक्षयाबरोबर या नाटकात आणखी कोण कलाकार आहेत, हे मात्र अजुन गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.