मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तमोत्तम ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अजय पुरकर. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. आताही त्यांच्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. तसेच चित्रपटगृहामध्ये प्रेक्षक ‘सुभेदार’ पाहताना भावुक होतानाही दिसत आहेत. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे.
आणखी वाचा – Video : ‘सुभेदार’ पाहिल्यानंतर अजय पुरकरांची लेक थिएटरमध्येच त्यांना मिठी मारुन रडली, भावुक व्हिडीओ व्हायरल
याच चित्रपटानिमित्त ‘मिरची मराठी’ रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अजय पुरकर यांनी मराठी माणसं व त्यांच्या कामाबाबत भाष्य केलं. “मराठी माणसांनी कोणती गोष्ट अंगी बाळगली पाहिजे? आणि कोणती गोष्ट सोडली पाहिजे? असं तुम्हाला वाटतं” असा प्रश्न अजय यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी अगदी योग्य उत्तर दिलं. ते म्हणाले, “काम आणि व्यवसाय करण्यासाठी मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे असं मला वाटतं. खूप कमी मराठी माणसांना इतर मराठी भाषा बोलता येतात”.
“पुण्यामध्ये मी लहान असताना सदाशिव पेठेमध्ये दोन सरदारजी बंधू होते. ते दोघं कार पेंटरी करायचे. फोनवर बोलताना कळायचंही नाही की ते सरदारजी आहे. इतकं उत्तम मराठी ते बोलायचे. उद्या जर मला माहीत आहे की, बंगळुरला जायचं आहे तर त्याआधी कन्नड भाषा शिका. तुम्ही वेगवेगळ्या भाषा शिकता तेव्हा खूप फरक पडतो. आज कोणतीही व्यक्ती कुठेही जाऊ शकते. कुठेही काम करु शकतात. याचा मराठी माणसांनीही फायदा घ्यायला हवा”. अजय यांच्या या विचारांचं सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.