बॉलीवूड अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर्षी त्यांच्या लग्नाचा ४४वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि जावई झहीर इक्बाल यांनीही सहभाग घेतला होता. याचे काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांनी या शत्रुघ्न सिन्हा यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा खास फोटो शेअर केला आहे. शत्रुघ्न सिन्हा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. याशिवाय ते राजकारणातही सक्रीय असून ते आता आसनसोलचे खासदार आहेत.
शत्रुघ्न सिन्हा आपल्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत येत असतात. अशातच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुभाष घई यांनी लिहिले की, “मुंबईत आल्यानंतर माझा पहिला मित्र आणि माझा पहिला हिरो शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम सिन्हा यांच्याशी ९ जुलै १९८० रोजी लग्न केले. माझी मानलेली बहीण असलेल्या पूनमचा कन्यादान विधी मी केला होता”.
सुभाष घई यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासह झहीर इक्बाल, सोनाक्षी सिन्हा, पूनम सिन्हा, सुभाष घई यांच्या पत्नी मुक्ता घई आणि शत्रुघ्न सिन्हा दिसत आहेत. त्याचबरोबर या फोटोमध्ये सोनाक्षी-झहीरच्या खास बॉण्डने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये त्या दोघांनी एकमेकांचा हात धरला असल्याचे पाहायला मिळत आहे. शत्रुघ्न सिन्हा व पूनम सिन्हा यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, हे दोघे जवळपास ४४ वर्षे एकत्र आहेत.
दरम्यान, सुभाष घई व शत्रुघ्न सिन्हा यांच्या मैत्रीबद्दल बोलायचे झाले तर, सुभाष घई यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट कालीचरण (१९७६) होता आणि त्यात मुख्य अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि अभिनेत्री रीना रॉय होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर शत्रुघ्न सिन्हा आणि सुभाष घई यांची मैत्री खूपच घट्ट झाली.