Star Pravah Parivaar Awards : सध्या सर्वत्र ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदा या सोहळ्याचं पाचवं पर्व असल्याने हा समारंभ सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. या सोहळ्यात मालिकाविश्वातील कलाकारांचा सन्मान सोहळा दिमाखात पार पडताना दिसणार आहे. तर यंदाच्या या खास पर्वाची शोभा वाढवायला मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. अशोक सराफ, निवेदिता सराफ, ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, दिग्दर्शक महेश कोठारे ही कलाकार मंडळी उपस्थित होती. तर स्टार प्रवाह वाहिनीच्या जुन्या मालिकांमधील कलाकारांनाही यावेळी आमंत्रित करण्यात आले होते.
‘स्टार प्रवाह’च्या एकूण १४ मालिकांमधील कलाकार यावेळी उपस्थित होते. तर काही कलाकारांचे खास डान्स परफॉर्मन्सही लक्षवेधी ठरणार आहेत. या सोहळ्यातील एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा पुरस्कार देऊन सन्मान. ‘महाराष्ट्रभूषण’ अशोक सराफ यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशोक सराफ यांना गेल्यावर्षी महाराष्ट्रभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांनी या ज्येष्ठ अभिनेत्याचा विशेष सन्मान केला.
आणखी वाचा – “माझ्याविरुद्ध कट रचला आणि…”, बॉलिवूडवर गोविंदाचे गंभीर आरोप, म्हणाला, “१०० कोटी रुपयांचा…”
यावेळी ९० च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांवर ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी बहारदार परफॉर्मन्स सादर केला. त्यानंतर अशोक सराफ यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या आठवणींना या मंचावर उजाळा देत सन्मान करण्यात आला. अभिजीत आमकर, शिवानी मुंढेकर, शर्वरी जोग, आकाश नलावडे, विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, यशोमन आपटे, मधुरा देशपांडे, पालवी कदम, आदिश वैद्य, सिद्धार्थ खिरीड या कलाकारांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास परफॉर्मन्स सादर केलेला आहे. याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अशोक सराफ यांचा सन्मान होताना पाहून त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ भावुक झालेल्या दिसल्या. ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात कोणती मालिका बाजी मारणार?, हे पाहणं रंजक ठरेल.