प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार दिवस-रात्र काम करत असतात. चेहऱ्यावर हसू ठेवून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम ही मंडळी करतात. मात्र हे करत असताना बऱ्याचदा कलाकार स्वतःचा त्रासही विसरतात. सतत काम, कष्ट करताना कलाकारांनाही स्वतःला वेळ देण्याची गरज असते. सुकन्या मोनेंनेही असंच काहीसं केलं. दिड वर्षांनी त्या पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्या आहेत. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेमधून सुकन्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण दीड वर्षांच्या ब्रेकमध्ये नक्की काय काय झालं? हे त्यांनी सांगितलं आहे. (sukanya mone new Marathi serial)
दीड वर्षांनी कमबॅक
स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेमध्ये त्या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. याचविषयी ITSMAJJA शी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, “जाणून-बुजून घेतलेला हा ब्रेक होता. काही शारीरिक त्रास मला होते. मला या सगळ्या त्रासावर थोडं काम करायचं होतं. मनासारखी भूमिकाही मला मिळत नव्हती. तिच तिच भूमिका साकारण्यातही मला काही रस नव्हता. काहीतरी वेगळं मिळावं असं सतत मला वाटत होतं”.
“त्याच त्याच भूमिका साकारुन आपण प्रेक्षकांच्या घरी जात असतो त्यांनाही कंटाळा येत असेल. काय सारखी ही गोड गोड बोलते असा तेही विचार करत असतील. कायतरी वेगळं प्रेक्षकांना मिळायला हवं असंही वाटत होतं. या मालिकेच्या माध्यमातून मला वेगळी भूमिका मिळाली याबाबत मला छान वाटतंय”. सुकन्या यांचे पती व मुलीलाही त्यांच्या कामाचा अभिमान आहे.
आणखी वाचा – रितेश देशमुखच्या सहकलाकाराचा मृतदेल तब्बल ३६ तासांनी हाती, नदीत पोहताना मृत्यूने गाठलं अन्…
वाढतं वजन, गुडघ्याचा त्रास अन्…
सुकन्या यांना नक्की काय आजारपण होतं? याबाबत ‘तारांगण’ला दिलेलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं. सुकन्या म्हणाल्या, “एकतर मला थायरॉइड आणि त्यामुळे माझं वजन वाढत चाललं होतं. आपल्या गुडघ्याच्या गादीला एक कव्हर असतं ते माझं फाटलं होतं. मला चालताना, उठताना, बसताना त्रास व्हायचा. जवळ जवळ मी महिनाभर झोपून होते. डॉक्टरही म्हणाले होते की, महत्त्वाच्या कामासाठी उठायचं आणि बाकी आरामच करायचा. ते जर आता केलंस तरच पुढे तुला काम करता येईल. त्यामुळे मी त्यांनी जे सांगितलं ते ऐकलं. फिजिओथेरपी घेतली आणि इतर उपचारही सुरु ठेवले. आता मी बरी झाले आहे. तरीही थोडाथोडा त्रास अजुनही आहे. पण आमचं प्रॉडक्शन आणि सहकलाकार माझी तितकीच काळजी घेतात. त्यामुळे हळूहळू आता मी काम करत आहे”. सुकन्या यांना छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.