मनोरंजन सृष्टीतील सर्वांसाठी ‘लाइट्स, कॅमेरा अँड अॅक्शन’ हे तीन शब्द अगदीच महत्त्वाचे आहेत. पण दक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी ‘लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन अँड राजकारण’ हे चार शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा चंदेरी पडदा गाजवलेले अनेक तारे आजपर्यंत राज्याच्या राजकारणात येऊन जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. सी. एन. अण्णादुराई, एम. करुणानिधी, एस. एस. राजेंद्रन, एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्या राजकारणातील सक्रिय सहभागानंतर अभिनेते राजनीकांत यांनीही लवकरच राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.
चंदेरी दुनिया गाजवल्यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेणाऱ्यांमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे आणि तो म्हणजे अभिनेता थलपती विजय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. थलपथी विजयने नुकतंच त्याच्या पक्षाची घोषणा केली आहे ज्याचे नाव ‘तमिलागा वेत्री कझघम’ आहे. निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आली असल्याचेही थलपती विजयने स्पष्ट केलं आहे. विजयचा ‘तमिलागा वेत्री कझघम’ हा पक्ष २०२६ची विधानसभा निवडणुक लढणार आहे.
#தமிழகவெற்றிகழகம் #TVKVijay https://t.co/Szf7Kdnyvr
— Vijay (@actorvijay) February 2, 2024
आपल्या अधिकृत निवेदनात विजय म्हणाला, “आपल्या पक्षाची नोंदणी ECI कडे करण्यात आली आहे. मी नम्रपणे सांगू इच्छितो की पक्षाच्या महापरिषद आणि कार्यकारिणीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत न लढण्याचा किंवा इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मला एक भ्रष्टाचार मुक्त सेक्युलर आणि प्रगतीवादी सरकार स्थापन करायचं आहे. धार्मिक भेदभाव, जातीय दंगे आणि भ्रष्टाचारावर चालणाऱ्या राजकारणाला मला थांबवायचं आहे”.
राजकारणात पूर्णपणे वेळ देणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे विजयने चित्रपटविश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकारणात पूर्णपणे लक्ष देता यावे व सक्रिय सहभाग घेण्यासाठी तो चित्रपटविश्वातून ब्रेक घेणार आहे. सध्या विजय हा वेंकट प्रभू यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे, अन् हा चित्रपट त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल असंही त्याच्या या निवेदनातून समोर येत आहे.
आणखी वाचा – शिवानी सुर्वेचं मंगळसूत्र इतर अभिनेत्रींपेक्षा आहे फारच युनिक, डिझाइनने वेधलं लक्ष, खास फोटो व्हायरल
दरम्यान, विजय थलापतीचा चाहता वर्ग मोठा आहे. याशिवाय सामाजिक कार्यातही विजय अग्रेसर असतो. त्यामुळे लोकांमध्ये विजय थलापतीचे काम पोहोचले आहे आणि त्यामुळेच त्याला राजकारणात याचा मोठा फायदा होईल, असे बोलले जात आहे.