Ajith Kumar Accident : तामिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अजित कुमार यांचा दुबईत धक्कादायक अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. कार रेसिंगच्या सरावात हा अपघात झाला आहे. या अपघातातून अजित कुमार पूर्णपणे बरे असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. अजित कुमार ताशी १८० किमी वेगाने कार चालवत होते आणि त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अजित कुमार पोर्श कार चालवताना दिसत आहे.
24H दुबई २०२५ कार रेसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते दुबईत आहेत. ५३ वर्षीय अभिनेता या शर्यतीसाठी सहा तासांचा रेसिंग सराव करत होते. सराव सत्र संपणार असताना त्याची गाडी डिव्हायडरला धडकली आणि सात वेळा गोलाकार फिरली. अजितच्या पोर्श कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि रुळावर सात-आठ वेळा फिरल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यानंतर ती गतिरोधकाला धडकली. अजितकुमार यांना तात्काळ गाडीतून बाहेर काढण्यात आले.
न्यूज१८ च्या वृत्तानुसार, अभिनेत्याचे व्यवस्थापक सुरेश चंद्र म्हणाले, “अजितला कोणतीही दुखापत झालेली नाही. तो निरोगी आहे. हा प्रकार घडला तेव्हा तो १८० किमी वेगाने गाडी चालवत होता”. अजित कुमार हे अजित कुमार रेसिंग टीमचे मालक असल्याची माहिती आहे. दुबई येथे होणाऱ्या शर्यतीत ते आपल्या संघातील सदस्यांसह सहभागी होणार होते.
आणखी वाचा – अंकिता वालावलकर होणाऱ्या नवऱ्यासह योगिता चव्हाणच्या भेटीला, फोटो शेअर करत म्हणाली, “दोन अतिविचारी मुली…”
अभिनेत्याच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलायचे झाले तर अजित कुमार ‘विदमुयार्ची’ चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे रविचंद्रन यांचा ‘गुड बॅड उगली’ हा चित्रपटही आहे. या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.