मालिका, नाटक, चित्रपट… या सगळ्याच माध्यमात अतुल परचुरे यांनी आपलं नाव उमटवलं आहे. अतुल यांनी मराठीसह हिंदी कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. मराठी सिनेसृष्टीत कार्यरत असताना आणि सगळं काही सुरळित सुरु असतानाच अचानकपणे अतुल परचुरे यांच्या आयुष्यात एक आजाररूपी संकट आलं. काही दिवसांआधी त्यांना कॅन्सर झाला होता. यावेळी त्यांना कठीण प्रसंगातून जावं लागलं. पण त्या गंभीर आजारावर मात करत अतुर परचुरे जिद्दीने पुन्हा उभे राहिले. पण कॅन्सरचा तो काळ आणि त्यानंतर उपचारांच्या काळ यातील कठीण यातनांना त्यांना सामोरे जावे लागले. या काळात त्यांच्याबरोबर हिंमतीने उभ्या होत्या त्या म्हणजे त्यांच्या पत्नी सोनिया परचुरे. (Sonia Parchure On Atul Parchure Cancer)
आपल्या नवऱ्याच्या संकटाच्या काळात भरपूर सोनिया यांनी खूप धावपळ केली होती. अतुल यांच्या पाठीशी त्या ठामपणे उभ्या राहिल्या. याचबद्दल सोनिया परचुरे यांनी ‘आरपार’शी संवाद साधला असून यामध्ये अतुल परचुरे यांचा कर्करोगाशी झुंजतानाचा खडतर प्रवास कसा होता, याविषयी त्या व्यक्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अतुलच्या जगण्याच्या इच्छेने मला लढण्याच बळ दिलं असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे. सोनिया परचुरे यांनी म्हटलं की, “अतुल हा माझ्यासाठी पहिल्यापासूनच हिरो होता. त्यामुळे मला माझ्यापेक्षाही अतुल ज्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांचं शांतपणे ऐकायचा ते पाहून जास्त वाईट वाटलं. कारण तुम्ही काहीतरी म्हणालात आणि अतुलने ते शांतपणे ऐकून घेतलं, असं कधीच होत नाही. एखादा आजार तुम्हाला किती असाह्य करुन जातो, हे मला तेव्हा कळालं”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरामध्ये पुन्हा प्रवेश करणार निखिल दामले?, म्हणाला, “सध्यातरी गुलदस्त्यात पण…”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “एका टप्प्यावर अतुलचा आवाज गेला. मी डॉक्टरांना म्हटलं की, अहो अतुलचा आवाज गेला. त्याचा आवाज जाऊन नाही चालणार. अतुलचा आवाज खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा ते मला फक्त हो मी समजू शकतो असं म्हणाले. त्याची ती अवस्था पाहून मला सतत वाटायचं की मी याला कसं यातून बाहेर काढू. आपण किती बायको वैगरे सगळं असलो तरीही त्या व्यक्तीला ज्या यातना होत असतात त्यातून त्याला आपण नाही बाहेर काढू शकत. त्यावेळी आपण हतबल होतो. तेव्हा मला असं वाटत होतं की आपण कितीही स्वतःला शहाणे समजत असलो जसं की मी हे करीन… मी ते करीन… पण इथे आपण काही करू शकत नाही”.
यापुढे सोनिया यांनी चाहत्यांच्या प्रेमाबद्दल व या काळात चाहत्यांनी अतुल यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “खूप लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. अनेक लोक फक्त अतुल बरा झाला पाहिजे असं म्हणत होते. भरपूर लोकांनी मला त्यावेळी फोन केले. लोक कुठेतरी जायचे. सोरटी सोमनाथ, गिरनार वगैरे ठिकाणांची नावे घ्यायचे आणि तिथे जाऊन अतुलसाठी प्रार्थना करायचे. आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं की, हे त्याच्यासाठी करा. पण लोक स्वतःहून त्याच्यासाठी प्रार्थना करायचे की, अतुल बरा झाला पाहिजे. आपलं खरं वागणं, सच्चाई कुठेतरी वर्क होते असं मला वाटतं आणि ती झालीच”.