विनोदी विषय, सामाजिक संदेश देणारे विषय आणि आशयघन रीलमधून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा रीलस्टार म्हणजे अथर्व सुदामे. अर्थवला न ओळखणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सोशल मीडियावर कंटेन्ट क्रिएटर म्हणून काम करत आजवर अथर्वने स्वतःची अशी ओळख निर्माण केली. पुण्याच्या या अथर्वचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावरुन अथर्व नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. कंटेन्ट क्रिएटरच काम करण्याआधी अर्थव नेमकं काय काम करायचा याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Atharva Sudame Lifestyle)
अथर्वने नुकतीच ‘झी युवा सन्मान’ या कार्यक्रमात हजेरी लावली होतो. यावेळी दिलेल्या मुलाखतीत अथर्वला “कंटेन्ट क्रिएटर होण्याआधी तू काय काम करत होतास?”, असा प्रश्न विचारला असता, यावर उत्तर देत तो म्हणाला, “कंटेन्ट क्रिएटर होण्याआधी तसा मी फार काही करत नव्हतो, माझ्या वडिलांचा बिझनेस आहे, तर मी तिथे जाऊन बसायचो. आणि तेव्हा मी एका बाजूला हे सर्व कंटेन्टचही काम करत होतो. जसं मी बूम झालो तसा मी या कंटेन्ट क्रिएटरकडे विशेष लक्ष दिलं. आणि आता मी फुलटाइम कंटेन्ट क्रिएटर म्हणून काम करतोय”.
यापुढे अथर्व म्हणाला, “कंटेन्ट क्रिएटर होण्याआधी मी युट्युबवरही मोठे व्हिडीओ टाकायचो. पण या व्हिडीओला लगेच हवा तसा प्रतिसाद मिळायचा नाही. ओळख मिळण्याआधी आपल्याला कशात तरी वाव हवा होता. म्हणून मी नाटकात काम करू लागलो. आणि त्यादरम्यान आपल्या स्वतःला व्यक्त होण्याचं माध्यम कोणतं आहे हा विचार करून मी युट्युबकडे वळलो. एकतर हे फुकट होतं आणि याकडे खूप प्रेक्षकवर्गही आहे, म्हणून मी या माध्यमाकडे वळलो. मी युट्युबवर जेव्हा पहिला व्हिडीओ टाकला, त्यांनतर अडीच-तीन वर्षांनी लोकांना कळलं की, मी याच्यावर काम करत आहे. एक, दोन वा दहा व्हिडीओ टाकून लगेच आपण प्रेक्षकांपर्यत पोहचू शकत नाही. तर माझ्याबाबतीत असं झालंय की, सतत व्हिडीओ टाकल्यानंतर तब्बल अडीच-तीन वर्षांनी मी लोकांपर्यत पोहोचलो. कदाचित तुम्हाला सहा महिन्यात सतत व्हिडीओ टाकल्यावर प्रसिद्धीही मिळेल. पण त्या सहा महिन्यात तुम्हाला शून्य प्रतिसाद मिळेल. आई-वडील, नातेवाईक, मित्र-मंडळी विचारतील की तू काय कामधंदा सोडून सेल्फी, कॅमेरा घेऊन फिरत आहेस. वेळ आणि वय असेल तर हे काम नक्की करा. लग्न झाल्यानंतर जबाबदारी असतानाही मी पूर्ण हे काम करु शकतो इतके पैसे मी कमावतो”.
यापुढे बोलताना अथर्व म्हणाला, “जेव्हा आपल्याला चार लोक ओळखतात तेव्हा प्रत्येकाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आधी त्यांना असं वाटायचं की, रस्त्यावर उभं राहून विनोद करतोय. यावरुन मला एक आठवतंय की, माझा कोणी मित्र नाही आहे. मला हेदेखील माहित आहे की, आता माझ्याकडे प्रसिद्धी, पैसा आहे म्हणून सर्व आहेत, हे जर नसेल तर जवळ असलेले चारजणही माझ्याबरोबर नसतील”.