शाहिरी बाजातील गाणी संपूर्ण महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. आपल्या महाराष्ट्राला लोकसंगीताचा वारसा लाभला आहे. हा संगीताचा वारसा मराठी कलाक्षेत्रातील कलाकार मंडळी पुढे नेताना दिसत आहेत. अशातच शाहिरी बाजासाठी लोकप्रिय असणाऱ्या गायकांच्या यादीत एका गायकाचं नाव आवर्जून घेतलं जातं. ते नाव म्हणजे नंदेश उमप. अनेक रिऍलिटी शोमधूनही नंदेश उमप हे नांव घराघरांत पोहोचलं. पोवाडा, अभंग अशी खासियत असलेल्या नंदेशने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. याशिवाय त्याने त्याच्या भारदस्त आवाजाने अनेक चित्रपटांमधील गाण्यांमधून छाप पाडली आहे. (Nandesh Umap Wedding)
अशातच नंदेश उमप हे नांव सध्या चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. नंदेश त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नंदेश उमपच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त नंदेश त्याच्या पत्नीसह परत लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्री समीरा गुजर हिने त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. दोघांच्या या पुनश्च शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटोही समोर आले आहेत. जवळचे कुटुंबीय, नातेवाईक व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत त्याने हा लग्नसोहळा उरकला.
“माझ्या लाडक्या नंदेश दादा व सरिता वहिनीच्या लग्नाचा २५वा वाढदिवस. बावनकशी सोन्यासारख्या मौल्यवान जोडीचा संसाराचा रौप्य महोत्सव त्यांच्या लेकीने, आयुषीने फार सुरेख समारंभ आयोजित करत पार पाडला. हे माझेच कुटुंब आहे आणि माझे हे कुटुंब असेच आनंदात राहो आणि लोकांना आनंदी करत राहो”, असं हटके कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
नंदेश उमप यांचे वडील शाहीर विठ्ठल उमप यांचा वारसा त्यांचा मुलगा पुढे नेत आहे. नंदेश-सरिता यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो लक्ष वेधून घेत आहे. नंदेश व सरिता यांचे वरमाला घालत तसेच अंगठी घालतानाचे अनेक फोटो त्यांचे व्हायरल होतं आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही नंदेशच्या लग्नाला हजेरी लावली होती.