‘बिग बॉस ओटीटी ३’ ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या रिऍलिटी शोमधील स्पर्धक अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसाठी चर्चेत आहे. अलीकडेच, त्याने शोमधील इतर स्पर्धक विशाल पांडेच्याही कानाखाली मारली. ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला पाहायला मिळाला. आता लोकप्रिय गायक अरमान मलिकने ‘बिग बॉस ओटीटी ३’ स्पर्धकाचा आणि त्याच्या नावाचा गोंधळ घालणाऱ्या चाहत्यांसाठी एक निवेदन जारी केले आहे. गायक अरमान मलिकने याबाबतचे स्पष्टीकरण इस्टाग्राम अकाउंटवरुन दिले आहे. (Singer Armaan Malik Statement)
गायक अरमान मलिकने त्याच्या सोशल मीडियावर असे लिहिले आहे की, “नमस्कार, मी गेल्या काही काळापासून एका समस्येकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु असे दिसत आहे की, आता हे प्रकरण हाताबाहेर जात आहे आणि मला त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. एक YouTube निर्माता, ज्याला आधी संदीप म्हणून ओळखले जायचे नंतर त्याचे नाव बदलून अरमान मलिक असे ठेवले आणि सध्या ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’मध्ये तो स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे”.
This had to be said. #ArmaanMalik pic.twitter.com/GB7HjuijtP
— ARMAAN MALIK (@ArmaanMalik22) July 8, 2024
अरमान मलिकने पुढे लिहिले, “यामुळे खूप गोंधळ निर्माण होत आहे, बरेच लोक मला चुकून टॅग करत आहेत आणि आम्ही दोघे एकच व्यक्ती आहोत असे समजत आहेत. मी हे पूर्णपणे स्पष्ट करु इच्छितो की, माझा या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही आणि मी त्याला किंवा त्याच्या जीवनशैलीचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. ही परिस्थिती माझ्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत आहे आणि अनेक वर्षांमध्ये मला पाठिंबा देणाऱ्या अनेक लोकांची दिशाभूल करत आहे”.
पुढे अरमान असेही म्हणाला की, “मी माझे नाव बदलण्यापासून किंवा माझे नाव घेण्यापासून कोणालाही रोखू शकत नाही, परंतु मी माझ्या समुदायाला यातून बाहेर येण्यास मदत करण्याची विनंती करतो. कृपया त्याच्याशी संबंधित कोणत्याही पोस्टमध्ये मला टॅग करणे थांबवा. तुमच्या समजुती व सहकार्याबद्दल धन्यवाद”. ‘बिग बॉस ओटीटी ३’ स्पर्धक अरमान मलिक त्याच्या दोन लग्नांमुळे चर्चेत आला आहे. तो त्याच्या दोन बायका पायल मलिक व कृतिका मलिकसह या शोमध्ये सहभागी झाला होता. पायल मलिक या शोमधून आधीच बाहेर पडली असली तरी अरमान अजूनही त्याची दुसरी पत्नी कृतिकाबरोबर ‘बिग बॉस ओटीटी ३’ चा भाग आहे.