भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर घटस्फोटाच्या बातम्या कानावर येत असताना पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने तिसरे लग्न करत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. शोएब मलिक या क्रिकेटरने पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सना जावेदसह लग्न केले आहे. विवाहसोहळ्याचे फोटोस शोएबने त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये सनाच्या गोल्डन ब्राइडल ड्रेसने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हातात वजनदार दागिने घालत अभिनेत्रीच्या नववधूच्या लूकने सार्यांना भुरळ घातली. (Shoaib Malik Third Weddig)
शोएबही सनाला मॅचिंग कपड्यांमध्ये दिसला. पांढऱ्या रंगाची शेरवानी घालून दोघेही खूप छान दिसत होते. निकाह सोहळ्याच्या फोटोंमध्ये शोएब नववधूच्या हातात धरत फोटो काढताना दिसला. शोएब मलिकची वधू सना जावेद ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने आजवर अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केले आहे. २०१२ मध्ये ‘शहर-ए-जात’ या मालिकेतून तिने सिनेविश्वात पदार्पण केले. त्यानंतर सना ‘रुसवाई’, ‘रोमियो वेड्स हीर’, ‘डर खुदा से’, ‘डंक’, ‘खानी’, ‘ए मुश्त-ए-खाक’, ‘प्यारे अफजल’, ‘काला डोरिया’सह अनेक मालिकांमध्ये दिसली. सध्या ती ARY वाहिनीच्या ‘सुकून’ या मालिकेत दिसत आहे.
शोएबबरोबरच्या लग्नानंतर सना जावेदने इन्स्टाग्रामवर तिचे नावही अपडेट केलं असल्याचं पाहायला मिळालं. तिने तिच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमधून ‘सना जावेद’ हटवून ‘सना शोएब मलिक’ असे नाव लिहिले आहे. विशेष म्हणजे सनाचे शोएब मलिकबरोबरचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी सनाने २०२० मध्ये पाकिस्तानी अभिनेता व गायक उमेर जसवालसोबत लग्न केले होते. मात्र, नंतर दोघांचा घटस्फोट झाला. शोएब मलिकने टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी २०१० मध्ये आयशा सिद्दीकीशी घटस्फोट घेतला होता.
सानियाशी लग्न करण्याआधीच, शोएबचे भूतकाळातील जीवन हा मुख्य चर्चेचा मुद्दा बनला कारण आयशा सिद्दीकी नावाच्या एका महिलेने दावा केला की पाकिस्तानी क्रिकेटरने तिच्याशी आधीच लग्न केले आहे आणि त्यानंतर त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. आयशा, ज्याला महा सिद्दीकी नावाने ओळखले जाते, ती व्यवसायाने हैदराबादी शिक्षिका होती. दरम्यान पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता शोएब सानियाशी लग्न करणार असल्याचा आरोप आयशाकडून करण्यात आला होता.