एखाद्या लग्नसोहळ्यातील सर्वात मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे उखाणा. उखाणा झाल्याशिवाय लग्नाला पूर्णत्व येत नाही असं म्हणतात. आणि ही काही बाबतीत खरंही आहे. नुकतंच अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. अगदी थाटामाटात अन् पारंपरिक अंदाजात ही जोडी काल (१ फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखे पसरले. त्याआधी दोघांनी ‘अखेर बंधनात’ असं म्हणत त्यांच्या साखरपुडा समारंभातील खास फोटोही शेअर केले होते. या फोटोंनी दोघांच्या नात्याची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला.
अशातच ही जोडी काल ठाण्यातील येउर हिल्स या ठिकाणी अगदी थाटामाटात विवाहबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाला मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ‘झिम्मा २’ ची टीमही या नव वधू-वराला आशिराव देण्यासाठी पोहोचले होते. त्याचबरोबर दोघांच्या जवळचे काही मित्रमंडळी व नातेवाईकही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
आपल्या अभिनयाने कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेणारी शिवानी सुर्वे तिच्या लग्नातही चांगलाच भाव खाऊन गेली. लग्नात घेतलेल्या उखाण्याने तिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी लग्नात तिने अजिंक्यसाठी खास उखाणा घेत असे म्हटले की, “दोन वाती, एक ज्योती, अजिंक्य माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती”. तिच्या या उखाण्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत तिच्या या उखाण्याला दाद देत तिचे कौतुक केले.
दरम्यान, लग्नसमारंभातील शिवानीच्या मॉडर्न अंदाजातील लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नासाठी शिवानीने खास गुलाबी रंगाचा डिझाइनर लेहेंगा परिधान केलेला पाहायला मिळाला. शिवाय डोक्यावर घेतलेल्या लेहेंग्यावरील दुपट्ट्याने नववधूचं लूक खुलून आलं होतं. हिरव्या बांगडया, डायमंडचे दागिने यांत शिवानी अधिकच सुंदर होती.