मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेताही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे आणि हा अभिनेता म्हणजे ‘शिवा’ मालिका फेम शाल्व किंजवडेकर. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ व ‘शिवा’ या मालिकांमधून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरांत लोकप्रिय झाला. ‘येऊ कशी तशी…’मध्ये त्याने साकारलेलं ओम हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. छोट्या पडद्यावर शाल्वचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. (Shalva Kinjwadekar and Shreya Daflapurkar Vyahibhojan)
वैयक्तिक आयुष्यात अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शाल्व किंजवडेकर-श्रेया डफळापुरकर गेली अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर आहेत. ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शाल्व-श्रेयाची जोडी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. गेल्यावर्षी या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता. यंदा ही जोडी विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. शाल्व आणि श्रेया यांच्या लग्नसराईला सुरुवात झाली असून नुकतंच त्यांचं व्याहीभोजन पार पडलं.
आणखी वाचा – 25 November Horoscope : कर्क राशीसह ‘या’ राशींना सोमवारी होणार आर्थिक लाभ, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
या व्याहीभोजनाचा खास फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “अलेक्सा प्ले एक दिन आप” आणि पुढे “व्याहीभोजन” असं म्हणत त्यांनी हे खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रेयाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तर शाल्वने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला आहे. दोघेही कॅमेऱ्यात बघून स्माईल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “अभिनंदन”, “छान दिसत आहात”, “नजर काढून घ्या”, “खूपच गोड” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या फोटोला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, शाल्व आणि श्रेयाने २०२३ मध्ये साखरपुडा केला होता. साखरपुड्यापासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच केळवणालाही सुरुवात झाली असून नुकतंच त्यांचं व्याहीभोजन पार पडले. त्यामुळे लवकरच हे जोडपे लग्नबंधनात अडकणार, हे पक्क आहे. मात्र अद्याप दोघांच्या लग्नाची तारीख माहीत नाही. त्यामुळे अनेक चाहते मंडळींना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.