आई होणं ही स्त्रीजन्मासाठी परिपूर्णता असतेच. पण त्यातूनही एका ‘लेकीची आई’ होणं हे स्त्रीला अधिक समृद्ध करतं. बाळाची चाहूल ही प्रत्येक आईच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना असते. आई होणं यापेक्षा अभूतपूर्व सुख कुठल्याही स्त्रीसाठी दुसरा कोणतच नसतं. याच आई होण्यापर्यंतचा प्रवास सोपा वाटत असला तरी तो सोपा नसतो. आईपणाशी खूप साऱ्या गोष्टी निगडीत असतात. अशीच आईपणाशी आणि या काळात तिच्याशी निगडीत कुटुंबाची होणारी अवस्था एका अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे मानसी सुरेश. मानसी सुरेश सध्या झी मराठी वाहिनीवर ‘शिवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Mansi Suresh Emotional)
अभिनेत्री मानसी सुरेश सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने चार दिवसांपूर्वी शेअर केलेला एक् व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने तिच्या बहिणीला झालेल्या बाळाचे काही खास क्षण शेअर केले आहेत. तसंच यावेळी तिने तिच्या व तिच्या कुटुंबियांच्या भावनाही शेअर केल्या आहेत. मानसीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर शेअर केला आहे. तसच या व्हिडीओखाली तिने लिहिलेल्या कॅप्शनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हिडीओखाली तिने असं म्हटलं आहे की, “मातृत्व… एवढं दुखणं सहन करुन, स्वतःची चिरफाड होऊनसुद्धा आपल्या बाळाला जवळ घेताना मात्र खुश असते ती असते आई. बाळाला जन्म देताना किती वेदना होत असतील? किती मनात प्रश्न असतील? किती भीती वाटत असेल? काय काय होत असेल? हे त्या आईलाच माहित”. पुढे अभिनेत्री म्हणाली, “दीदी तू आई झालीस, बापरे… तू खूप खूप शक्तीशाली आहेस. गेले नऊ महिने ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण जवळ आला आणि शेवटी आम्हाला आमची लक्ष्मी मिळाली. खरंच आई-बाबा होणं सोपं नसतं आणि आता तुमच्या दोघांच्या आयुष्याला नव्याने सुरवात झाली आहे”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी मावशी झाली आहे, मला खूप खूप छान वाटत आहे. एका जीवाला नऊ महिने पोटात वाढवून या जगात सुखरूप घेऊन येणं, त्याला जन्म देणं… स्त्री काहीही करु शकते… काहीही…” तसंच या व्हिडीओमध्ये तिने बहिणीला भेटायला जाण्याच्या आधीच्याही भावना व्यक्त केल्या आहेत. यात तिने असं म्हटलं आहे की, “मी मावशी होणार आहे. तर आता दीदीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. त्यासाठी मी मुंबईहूं निघाली आहे. मी बहिणीला भेटायला जायला खूपच उत्सुक आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडूदेत. हीच बाप्पाकडे प्रार्थना”.