‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे, तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील गंमतीशीर आहे. त्याच्या या विनोदी स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी आलाच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. कुशलला त्याच्या विनोदाचं जबरदस्त टायमिंग, हटके विनोद शैली ही त्याला इतर कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळं ठरवते. विनोद विश्वात आपल्या अनोख्या स्टाइलने नाव कमावणाऱ्या कुशल बद्रिकेचे एका कलाकाराने कौतुक केले आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते’ मालिका फेम रुपाली भोसले. (Rupali Bhosle Proud Kushal Badrike)
रुपाली भोसलेने कुशलबरोबरचा नागपूर विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसह तिने कुशलचे कौतुक केलं आहे. रुपालीने या फोटोखाली लिहलेल्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “नागपूर विमानतळावर अचानक मला हा माझा सहकलाकर भेटला. एकमेकांचं कौतुक करत होतो आणि अभिमान वाटत होता. माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात कुशल बद्रिके होता. आता २० वर्षाहून जास्त काळ झाला आणि हा मुलगा जरा सुद्धा बदलला नाही. पण या मुलाने जे काही काम केलं आहे ते कमाल आहे”.
यापुढे रुपालीने “कुशल टाइमिंगची कमाल जाण असलेला आणि हाडामासाचा कलाकार आहे. मी करिअरची सुरुवात या कमाल कलाकाराबरोबर केली याचा मला आनंद आहे. कुशल तुझा अभिमान वाटतो. तुला खूप खूप शुभेच्छा” असं म्हणत त्याचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. रुपालीच्या या पोस्टखाली कुशलनेही त्याची प्रतिक्रिया व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “तशी आपण संघर्ष करायला एकत्र सुरुवात केली, पण तेव्हाचा एकही फोटो माझ्याकडे नाही. पण आज सुपरस्टार रुपालीबरोबर माझा फोटो आला”.
दरम्यान, या फोटोला कुशल व रुपाली यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांना या फोटो आवडल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसंच दोघांनी आपल्या मेहनतीने आजवर कामावलेल्या प्रसिद्धी व लोकप्रियतेबद्दल कौतुकही केलं आहे. तसेच काहींनी “नवीन काही प्रोजेक्ट आणताय की नाही आम्हाला हसायला” असंही म्हटलं आहे.