यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ हा पुरस्कार खऱ्या अर्थानं संस्मरणीय ठरला. कारण यंदा झी मराठी वाहिनीने २५ वर्ष पूर्ण केली. वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदाचा ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा तब्बल दोन दिवस पार पडला. या सोहळ्यात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यंदा वाहिनीचं आणि यावर सुरू झालेली पहिली मालिका ‘आभाळमाया’चं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करण्यात आलं. यावेळी सर्वोत्कृष्ट नायिका हा पुरस्कार अभिनेत्री पूर्वा कौशिकला मिळाला. तिच्या ‘शिवा’ मालिकेतील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने पूर्वाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Purva Kaushik On Zee Marathi Award 2024)
पूर्वाने पुरस्कार सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत आणि असं म्हटलं आहे की, “हे सगळं खूप जास्त भारावून टाकणारं आहे. एखादी गोष्ट सातत्याने करत राहणं आणि आपल्या कामात सातत्य असणं हे आपल्याला खूप काही देऊन जातं. मी बाकी आळशी असले तरी अभिनयाला माझे सातत्य होतं आणि यापुढे कायम असेल. याच सातत्यामुळे ‘शिवा’ ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त जवळची आणि मोठी घडली. झी मराठीची सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून मला सन्मान दिला. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचं चीज झाल्यासारखं वाटत आहे”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिकेची मृत्यूशी झुंज, पतीच्या निधनानंतर अवस्था वाईट, मुलाने सांगितलं, “परिस्थिती गंभीर…”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “झी मराठीचं २५वे वर्ष आणि त्यात माझा सहभाग असणं हीच मुळात मोठी गोष्ट आहे. या सगळ्यासाठी झी मराठीचे खूप आभार आणि जगदंब प्रोडक्शनचे ही खूप खूप आभार. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात हळवा, भारावून टाकणारा, खुश करणारा क्षण आहे आणि मला तुम्ही हा अनुभव दिलात त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार. यासाठी मी कायम ऋणी असेन आणि असंच सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करत राहीन”.
दरम्यान, अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला. तसंच हा पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री खूपच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. आई-वडिलांच्या आठवणीत पूर्वाच्या डोळ्यांतून अश्रू वाहिले. यावेळे तिने आपल्या भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “मी आणि आई-बाबा जेव्हा हा सोहळा घरी बसून बघायचो. तेव्हा माझे आई-बाबा होते. त्यांची खूप इच्छा होती की, मला हा पुरस्कार मिळावा. पण आज ते जेव्हा मिळालं तेव्हा ते नाहीत. आज आई-बाबा असते तर त्यांना खूप छान वाटलं असतं”.