Smita Deo Emotional Post On Seema Deo : हरहुन्नरी अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आजारपणाने वयाच्या ८१व्या वर्षी निधन झालं. सीमा देव यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मागील वर्षी रमेश देव यांनी या जगाचा निरोप घेतला. सीमा देव व रमेश देव यांच्या मृत्युच्या बातमीने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला खूपच मोठा धक्का बसला आहे. रमेश देव व सीमा देव यांची दोन्ही मुलं अजिंक्य देव व अभिनय देव चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. सीमा देव यांच्या निधनानंतर त्यांच्या धाकट्या सूनबाई स्मिता देव यांनी पोस्ट शेअर केली आहे, दरम्यान त्या भावुक झाल्या आहेत.
स्मिता देव यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ”सासूबाईंचे निधन झाले यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे. त्या केवळ माझ्या सासूबाईच नव्हत्या तर त्या माझ्या आईसमान होत्या. खऱ्या अर्थानं त्या माझ्या सर्वाधिक जवळच्या व्यक्ती होत्या. मी जेव्हा अभीला (अभिनय देव) डेट करत होते. तेव्हा त्यांना असं वाटलं की ही ‘बांद्राची छोकरी’ इतकी मॉडर्न, या घरात कसं काय जुळवून घेईल? मग जसा काळ सरला, जेव्हा माझं व अभिनयचं लग्न झालं त्यानंतर मात्र माझ्याबद्दल जाणून घेऊन त्यांना खूपच आश्चर्य वाटले आणि मी देखील त्यांना उत्तम सून असल्याचं सिद्ध करून दाखवले. माझ्या लग्नानंतर आम्ही फार घनिष्ठ मैत्रीणी झालो”.
“त्या मला म्हणाल्या होत्या की, त्यांना माझ्यासारखीच मुलगी हवी होती. त्यांनी मला त्यांच्या मुली इतकेच प्रेम दिले. मी व अभिनय कामावरून पुन्हा केव्हा येणार याची त्या वाट पाहत सोफ्यावर बसून त्यांच्या सासू-सूनेच्या मालिका पाहायच्या. घरी आल्यावर मग मी त्यांच्या मांडीजवळ बसून असायचे. त्यावेळी त्या माझ्या डोक्यावरून हात फिरवायच्या आणि मग त्या दिवसाचा सगळा थकवा निघून जायचा”.
“आम्हा दोघींना वेगळं करणार कोणीच नव्हतं. आम्ही साडी खरेदी करायला जायचो. त्याचसोबत आम्ही दोघी भाजी व इतर समानही आणायला जायचो. जेव्हा मी एकटी भाजी घेण्यासाठी बाहेर पडायचे तेव्हा भाजीवाले त्यांची विचारपूस न चुकता करायचे. कित्येकदा फळवाल्यांनी माझ्याकडे सासूबाईंसाठी केळी पाठवून दिली, आणि त्याचे पैसेदेखील घेतले नाहीत. बरेचदा त्या त्यांच्या बालपणाबद्दल, रमेश देव यांच्याबद्दल, त्यांच्या संघर्षांबद्दल अनेक गोष्टी सांगायच्या. त्यांच्या सासूबाईंबद्दलही त्या मला सांगायच्या. आमचे सर्वात धाकटे प्रताप काका त्यांना वहिनी नाही तर आईच म्हणायचे. त्यांनी प्रताप काकांच्या मुलांवर, नातवंडांवर खूप प्रेम केले. त्यांनी आमच्या संपुर्ण कुटुंबाची मुठ फार चांगल्या प्रकारे घट्ट बांधली होती.”
“जेव्हा मी व अभिनयने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तो त्यांच्यासाठी एक धक्का होता. आम्ही दोघांनी त्यांना आमच्यासोबत राहायला सांगितलं, परंतु त्या दोघांना त्यावेळी त्यांचा कम्फर्ट झोन हा फार महत्त्वाचा होता असं मला वाटतं. आणि शेवटी त्या त्यांच्या आयुष्याच्या त्या पटलावर आल्या जेव्हा त्या स्वत:लाही ओळखू शकत नव्हत्या…”, अशी भावुक पोस्ट स्मिता देव यांनी लिहिली आहे.