‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत येणाऱ्या रहस्यमय अशा वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत येणारी रंजक वळणे काही प्रेक्षकांना पटत नसल्याने त्यांनी मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. यावर आता मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ऐश्वर्या या मालिकेत रुपाली हे पात्र साकारताना दिसत आहेत. विरोचकच्या भूमिकेत रुपाली हे पात्र साकारत ऐश्वर्या यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. (Aishwarya Narkar Answers to Trollers)
सोशल मीडियावर ऐश्वर्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच या मालिकेतील कलाकारांनी मिळून एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. ऐश्वर्या नारकरांसह तितीक्षा तावडे, अमृता सकपाळ, एकता डांगर या व्हिडीओमध्ये धमाल करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्याने कमेंट करत मालिका बंद करण्याबाबत भाष्य केलं आहे.
व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुमच्या हावभावा सारखीच तुमची मालिका झाली आहे. आधी आम्ही न चुकता मालिका पाहायचो. आता नाही पाहत. कारण चांगल्या मालिकेची माती केली आहे. आता आटोपत घ्या”. नेटकऱ्याच्या या कमेंटवर ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर देत म्हटलं आहे की, “तुम्ही बघत नाही हे उत्तम आहे. मालिकेवर १०० कुटुंब अवलंबून असतात. त्यांच्याशी तुम्हाला काही घेण-देण नसेल तरी आम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही टीव्ही बंद केलात तर जास्त बरं. मालिका बंद व्हायची तेव्हा होईल”.

“प्रेक्षकांचा आदर करा”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. यावर अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, “आम्ही आदर करतोच. पण ज्यांना हे माहित नाही की, १०० कुटुंब मालिकेवर जगतात. ही एक इंडस्ट्री आहे. दैनंदिन मालिका हे कमवण्याचं माध्यम आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुमचा टीव्ही बंद करा. हाच उपाय आहे. त्या कुटुंबाच्या उपासमारीचं कारण बनवण्याऐवजी तुम्ही टीव्ही बंद करा. प्रेक्षक म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरु नका. तुम्ही देखील इंडस्ट्रीचा आदर केला पाहिजे”.