मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही टेलिव्हिजवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. अगदी अल्पवधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे, श्वेता मेहंदळे, राहुल मेहंदळे, अभिजीत केळकर यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. अशातच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दोन वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या निरोपाच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अखेर मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका निरोप घेणार असल्याबद्दल सांगितले. Titeeksha Tawde emotional)
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तितीक्षा तावडेने नेत्राच्या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला होता आणि या व्हिडीओखाली तिने “निरोप घेणे कठीण आहे” असं म्हटलं होतं. त्यानंतर आता तितीक्षा मालिकेच्या निरोपाबद्दल पुन्हा एकदा भावुक प्रतिक्रिया दिली आहे. मालिकेच्या दोन वर्षांच्या प्रवासानंतर आता निरोपाच्या क्षणी तितीक्षाच्या डोळ्यांतून अश्रू वाहिले. ‘इट्स मज्जा’च्या एक्स्क्लुसिव्ह व्हिडीओत तितीक्षाने तिच्या भावना व्यक्त केल्याआणि या भावना व्यक्त करताना तितीक्षाला रडू कोसळले.
आणखी वाचा – Paataal Lok या लोकप्रिय वेबसीरिजचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, कधी प्रदर्शित होणार?
यावेळी तितीक्षा असं म्हणाली की, “फार काही बोलणार नाही. पण सर्वांना मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे. मालिकेचे निर्माते दिग्दर्शक यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवला. खूप आव्हानात्मक भूमिका मला तुमच्यामुळे करता आली. संपूर्ण टीमने माझ्याकडून जे अभिनय कौशल्य काढून घेतले त्यामुळे मला आता मागे वळून पाहताना मी कलाकार व अभिनेत्री म्हणून किती समृद्ध झाली आहे हे कळत आहे. एका सकारात्मक टीमबरोबर आणि लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. ही दोन वर्षे अगदी पटकन गेली. याचदरम्यान माझं लग्नही झालं. त्यावेळीही तुम्ही अगदी सहजपणे सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, धन्यवाद”.
तसंच अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनीही त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी मालिकेचा सेट पाडल्याचे दाखवले आहे. राजाध्यक्षांचे घर व आजूबाजूचा परिसर या व्हिडीओमध्ये मोडल्याचे पाहायला मिळत आहे. “निरोप” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, मालिकेची आगळीवेगळी कथा व कलाकारांचा सशक्त अभिनय यामुळे गेली दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. मात्र अखेर दोन वर्षांनी ही मालिका आता निरोप घेणार आहे.