बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. विशेषतः ती फिरताना पापाराझींच्या कॅमेरामध्ये स्पॉट होताना दिसते. पापाराझींच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत सारा हे नाव आवर्जून घेतलं जातं. साराची खास गोष्ट सांगायची झाली तर ती कधीही कॅमेऱ्यापासून लपत नाही. बिनधास्त ती कॅमेराला फेस करत पापाराझींसह संवाद साधताना दिसते. पण यावेळी जेव्हा सारा कॅमेरासमोर आली तेव्हा पापाराझींना पाहून तिचा राग अनावर झाला आणि ती त्यांच्यावर चिडली. सारा पापाराझींवर रागवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sara Ali Khan Angry On Paparazzi)
सारा अलीकडेच गरिबांना अन्न वाटप करण्यासाठी गेली होती. अन्न वाटप करताना काही पापाराझी आले आणि तिचा व्हिडीओ बनवू लागले, हे अभिनेत्रीला काही पटले नाही त्यामुळे ती पापाराझींवर रागावली. साराचा अन्नदान करतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रस्त्याच्या कडेला बसलेल्या गरिबांना अन्न वाटप करताना दिसत आहे. या व्हिडीओत ती पापाराझींना व्हिडीओ न बनवण्याची विनंती करत असल्याचेही दिसत आहे.
व्हिडिओमध्ये सारा रागाने असं बोलताना दिसत आहे की, “कृपया असे करु नका. मी तुम्हाला विनवणी करुन थकले आहे. पापाराझींना पाहून साराचा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसला. अन्न वाटप केल्यानंतर पापाराझींना बोल लगावून ती रागाने तिच्या कारकडे जाताना दिसली. साराच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “कृपया तिला प्रायव्हसी द्या”. साराच्या आत्यानेही कमेंट करत म्हटलं आहे की, “मी दर शनिवारी पापाराझींना न बोलावता असे करते. हे रेकॉर्ड करु नका. हेच ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे”.
साराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सारा अली खानचे एकामागोमाग एक दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये साराचे भरभरुन कौतुक झाले. साराचा पहिला ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर करिश्मा कपूर, विजय वर्मा, डिंपल कपाडिया आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. त्यानंतर साराचा ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील साराची भूमिका पूर्णपणे वेगळी होती. या चित्रपटासाठी साराचे खूप कौतुक झाले आहे.