‘आयुष्यावर बोलू काही’मुळे कायम चर्चेत असलेले कवी, गायक संदीप खरे यांची लेक रुमानी खरे हिच्या नव्या मालिकेतील एण्ट्रीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘दुर्गा’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रोमोवरुन दुर्गा या मालिकेत रुमानी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याआधीही रुमानीने झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतून रुमानीने प्रेक्षकांच्या मनात घर तर केलंच शिवाय अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं. या मालिकेनंतर आता रुमानी पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज होत आहे. (sandeep khare special post)
लवकरच रुमानीची म्हणजेच लेकीची आगामी दुर्गा ही मालिका येत असल्याने संदीप खरे यांनी सोशल मीडियावर छान पोस्ट शेअर केली आहे. लेकीचं भरभरुन कौतुक करत संदीप खरे यांनी प्रोमो शेअर करत असं म्हटलं की, “प्रमुख भूमिका असलेली लाडक्या लेकीची दुसरी मालिका. अगदी तिच्या भूमिकेचंच नाव मालिकेला दिलं. कसं वाटतंय हा अत्यंत मूर्खपणाचा प्रश्न अनेकदा खूप चुकीच्या वेळी विचारला जातो. मला आता कोणी विचारलं तर मला वेगळं वाटणार नाही पण खरं सांगू शब्दात सांगता येणंही खरंच नाही जमणार. अगदी परवापर्यंत तर एवढीशी होती आणि आता शूटिंग, प्रवास, उलट सुलट श्येड्युल सगळं सांभाळत आम्हालाच सांगत असते की चिल बाबा”.
पुढे त्यांनी असं लिहिलं आहे की, “मग जेव्हा घरी येते तेव्हा सगळं बाजूला ठेवून तशीच धमाल पण करते. आम्ही आई-बाबांना लेकीचं कौतुक वाटणारच पण तिच्या पहिल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेपासून आताच्या या प्रोमोपर्यंत साऱ्यांचंच उदंड प्रेम, आशीर्वाद तिला लाभत आहेत. या दुसऱ्या मालिकेलाही तुमचे आशीर्वाद, कौतुक तिला लाभेल असा विश्वास आहे. एक गंमत मात्र वाटते तिच्या शांत, शहाण्या, समंजस स्वभावाला ‘दुर्गा’ नाव असलेली भूमिका मिळावी हा योगायोग फारच मजेशीर आहे. मालिका जरुर पाहा. तुमचे अभिप्राय महत्वाचे आहेत”.
‘कलर्स मराठी’च्या ‘दुर्गा’ या नव्या मालिकेत रुमानी खरेसह अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसंच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता प्रधान महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.