Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ म्हटलं की वादविवाद, भांडण हे आलंच. अशातच बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाची सुरुवातचं अनेक भांडणांनी व वादांनी झाली. हे पर्व चर्चेत राहण्याचं कारणचं या घरातील भांडणं व वाद आहेत. घरात कोणतेही टास्क आले की स्पर्धक सदस्यांचा हैदोस सुरू होतो. त्यामुळे आपापल्या आवडत्या कलाकारांना वाचवण्यासाठी बाहेर प्रेक्षकांमध्येही खडा जंगी सुरू होते. हे पर्व सुरु झाल्यापासून या गहरात अनेक भांडण व वाद पाहायला मिळत आहेत. मात्र या भांडण व वादात काल एका प्रसंगाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. आज सर्वत्र रक्षाबंधननिमित्त आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातही काल रक्षाबंधन झाले. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
रविवारच्या भाऊच्या धक्क्यावर कलर्स मराठी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका अबीर गुलालची टीम पाहुणी म्हणून आली होती. विशेष म्हणजे यातील दोन पाहुणे हे या घरचे आधीच्या सीझन मधील स्पर्धक होते, त्यामुळे या भागाला आणखीनच रंगत आली. या भागात आणखी एक रंजक घटना पाहायला मिळाली ती म्हणजे ‘अबीर गुलाल’ या मालिकेतील श्री म्हणजेच अभिनेत्री पायल जाधवने सूरज चव्हाणला राखी बांधली. राखी बांधत असताना पायल त्याला “तुझा खूप अभिमान वाटतो” असं म्हणते हे ऐकून त्याला अगदीच गहिवरून येतं.
पुढे पायल त्याला “आसपास रक्षाबंधन आहे” असं म्हणत असतानाच सूरज तिला राखी बांधण्यासाठी हात पुढे करतो आणि तिच्याकडून राखी बांधून घेतो. तसंच तो तिला आपली बहीण मानत पायाही पडतो. त्याच्या या साध्या कृतीवर घरातील सर्व सदस्य अवाक होत त्याचं कौतुक करतात. त्याच्या या छोट्याश्या कृतीने तो अनेकांची मनं जिंकतो. अचानक मिळणारी बहिणीची माया पाहून यावेळी सुरजही खूप भावुक झालेला पाहायला मिळालं.
सूरजची ही कृती घरातील सदस्यांबरोबरचं अनेक चाहत्यांनाही भावली आहे आणि त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. “राखी बांधली तर मोठ्या बहिणीच्या पाया पडला. याला म्हणतात सुसंस्कृतपणा”, “आपण संस्कार विसरलोय, सुरजसाठी हे नॉर्मल आहे”, “आपले संस्कार महाराष्ट्राला दाखवणारा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणजे सूरज”, “नुसतं रक्षाबंधन ऐकलं आणि सूरजने हात पुढे केला”, “सूरजशिवाय ‘बिगबॉस’ नाही”, “सूरज नसता तर मराठी माणसाने ‘बिग बॉस’ बघितलंच नसतं”, “आम्ही फक्त सुरज मुळे ‘बिग बॉस’ बघतो”, “सुरज शेवटपर्यंत ‘बिग बॉस’च्या घरात पाहिजे, सूरजकडून महाराष्ट्र खूप काही शिकतोय”.
आणखी वाचा – नवऱ्यासह परदेशात राहणारी पूजा सावंत रक्षाबंधनला भावुक, म्हणाली, “मी तुमच्याबरोबर नाही आणि…”
काही दिवसांपूर्वीच सुरज चव्हाणला त्याच्या बहिणीची आठवण सतावत होती. आई वडील गेल्यावर मोठ्या बहिणीनेच मायेची सावली दिल्याचे त्याने शोमध्ये कबूल केले होते. यावेळच्या रक्षाबंधनला बहिणीकडून राखी बांधता येणार नाही याचे दुःख त्याला सतावत होते. मात्र त्याला पायलच्या रूपात आणखी एक बहीण मिळाल्याने तो गहिवरुन जातो.