Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा तिसऱ्या आठवड्यातील ‘भाऊचा धक्का’ अगदी रंजक ठरला. तिसऱ्या आठवड्यात ‘बिग बॉस’ने मोठा धक्का दिला. एकाच आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर पडले. निखिल दामले व योगिता चव्हाण यांचा शोमधील प्रवास संपला. हा प्रेक्षकांसाठीही धक्का होता. तर हे दोन्ही सदस्य टीम B मधील होते. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण टीमसाठीही धक्काच होता. आता चौथ्या आठवड्यात प्रत्येक जण स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. टास्क म्हटलं की, एकमेकांवर आरोप करणं, भांडण होणं हे आपसूकच येतं. आताही असंच काहीसं घडणार आहे. ‘बिग बॉस’ दिलेल्या नव्या टास्कमध्ये जान्हवी, निक्की, अंकिता आणि टीम B मधील इतर सदस्यांबरोबर भांडणं होताना दिसणार आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘कलर्स मराठी’ वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये सदस्यांची भांडणं आणि टास्क जिंकण्यासाठी चाललेली चढाओढ दिसत आहे. या नवीन प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ ‘सत्याचा पंचनामा’ होणार असल्याचं सांगत आहेत. यात ‘बिग बॉस’ जान्हवीला आपण निक्की यांच्या सावली आहात, आपलं स्वत:चं असं अस्तित्व नाही असं म्हणतात. यावर टीम B आम्ही सहमत आहोत असं म्हणते. अंकिता ‘बिग बॉस’च्या या वक्तव्याला संमती दर्शवताच निक्की तिला ‘शेंबडी’ असं म्हणते. तर निक्की आर्याला ‘बालिश बुद्धी’ म्हणत तिच्या सत्याचा पंचनामा करते. तसंच या प्रोमोमध्ये टीम A व टीम B मध्ये चांगलीच जुंपली असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रोमोच्या शेवटी जान्हवी तिचा रागही व्यक्त करतानाचे पाहायला मिळत आहे.
या नवीन टास्कमधील राडे पाहून प्रेक्षकही निक्की-जान्हवीवर संतापले आहेत. “निक्कीचा ग्रुप सारा झटला पण सुरजभाईचा रुबाब न्हाय हाटला”, “निव्वळ थिल्लर पोरगी जान्हवी”, “आता तर निकीच्या आवाजाने पण इरिटेट होत आहे” अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी या प्रोमोवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आजच्या भागात कोणता स्पर्धक कोणत्या स्पर्धकाला भारी पडणार? आणि या सत्याच्या पंचनामामध्ये कुणाकुणाचा पंचनामा होणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यासाठी आजच्या भागाची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. कालचा ‘भाऊचा धक्का’ अनेक कारणांमुळे गाजला. या भागात प्रेक्षकांसह सदस्यांनादेखील मोठे धक्के मिळाले आणि ते धक्के म्हणजे निखिल व योगिता यांच्या एलिमिनेशनचे. कालच्या भागात दोन स्पर्धकांनी या घराचा निरोप घेतला.
दरम्यान, ‘भाऊचा धक्का’मध्ये घरातील सर्व स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले. एकमेकांची तक्रार सांगितली. तसेच एकमेकांची उणीधुणीही काढली. अशा सर्वच स्पर्धकांचा रितेशने समाचार घेतला. सर्व स्पर्धकांचे ऐकून घेतले त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना ऐकवलेदेखील. तसंच या घरात एक नवीन खोलीही उघडण्यात आली. यात घरातील स्पर्धकांनी एकमेकांविषयीची केलेली चुगली ऐकवून दाखवण्यात आली. यामुळे सर्वांना एकमेकांविषयीचे खरे रंग दिसले.