‘पठाण’, ‘जवान’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशांनंतर प्रेक्षकही धमाका करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अशातच सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. इतकंच नव्हे तर त्याच्या आगामी ‘टायगर ३’ चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने कमी वेळातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सलमान खानचे चाहते ‘टायगर ३’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच चाहत्यांसाठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Tiger 3 Trailer Out)
“देश के अमन और देश और दुश्मनों के बीच कितना फासला है… सिर्फ एक आदमी का। टाइगर।” टायगर ३’चा ट्रेलर या दमदार ओळीने सुरू झालेला पाहायला मिळतोय. आणि ‘जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं…’ या संवादाने ट्रेलरचा शेवट होतो. या दोन्ही संवादांमध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्या मिशनची ताकदवान कथा पाहायला मिळतेय. ही कथा थेट पाकिस्तानशी जोडली गेली असल्याची चर्चा आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या या चित्रपटाच्या ट्रेलरने खरोखरच सोशल मीडियावर धमाका केला आहे.
ऍक्शन-थ्रिलर चित्रपट ‘टायगर ३’ चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरखाली आदित्य चोप्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान, कतरिना व इम्रान मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा ‘एक था टायगर’ (२०१२) आणि ‘टायगर जिंदा है’ (२०१७) चा सिक्वेल आहे.
‘टायगर ३’ च्या नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, देशाचे रक्षण करणारा रॉ एजंट अविनाश सिंह राठौर पुन्हा एकदा एका मिशनवर निघाला आहे, पण हे मिशन त्याच्या ओळखीचे असल्याचं कळतंय. अविनाश उर्फ टायगर ज्याने आयुष्याची २० वर्षे भारताच्या रक्षणासाठी घालवली, तो देशद्रोही व शत्रू असल्याचं खोटे आरोप त्यावर करण्यात आले आहेत. आता आपल्या देशाला व कुटुंबाला वाचवण्यासाठी हा टायगर कोणते प्रयत्न करणार हे पाहणं चित्रपटात रंजक ठरेल.
या चित्रपटात कतरिना कैफने झोयाची भूमिका साकारली असून ती माजी आयएसआय एजंट आणि टायगरची पत्नी आहे. तर इमरान हाश्मी नकारात्मक भूमिकेत आहे. या चित्रपटात रेवती, रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा, रणवीर शौरी यांच्याही भूमिका आहेत. तसेच शाहरुख खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.