‘सैराट’सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर रिंकू राजगुरु हे नाव अवघ्या महाराष्ट्रात पोहोचलं आहे. ‘सैराट’नंतर रिंकूने आणखीही काही चित्रपट केले. मात्र ‘सैराट’मुळे रिंकूला वेगळीच लोकप्रियता मिळाली. एका गावातील सामान्य मुलगी अन् तिच्या आयुष्यातील घडामोडी रिंकूने अचूक साकारल्या. ‘सैराट’मधील आर्ची या पात्राने रिंकूला महाराष्ट्रातील घराघरांत ओळख मिळवून दिली. यामुळे तिचा चाहतावर्गदेखील चांगलाच बनला आहे.
रिंकू ही सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकत्याच एका शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. रिंकूने नुकताच तिच्या आयुष्यातील पहिल्या वहिल्या लाइव्ह कॉन्सर्टचा अनुभव घेतला. सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या पुण्यातील कॉन्सर्टला रिंकूने खास हजेरी लावली होती. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रिंकूने अरिजीतच्या लाईव्ह कॉन्सर्टमधील खास व्हिडीओ शेअर “जेव्हा तुमच्या मनातली गोष्ट सांगायला शब्द सापडत नाहीत. तेव्हा संगीत हे तुमच्या मनातील गोष्ट सांगतं” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर “माझा आयुष्यातील हा पहिलाच कॉन्सर्ट होता आणि याचा अनुभव खूपच भारी होता” असंही म्हटलं आहे.
रिंकूने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती अरिजीतच्या गाण्यावर ठेका धरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत तिच्याबरोबर महेश मांजरेकरांची मानस कन्या गौरी इंगावलेदेखील अरिजीतच्या गाण्यांचा आनंद घेत आहे. दोघीजणी अरिजीतच्या गाण्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. तसेच अरिजीतच्या कॉन्सर्टमध्ये या दोघीही भारावून गेल्या आहेत.
दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकत्याच आलेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावेसह ती एका चित्रपटाचं चित्रीकरण करताना दिसली होती. त्यामुळे तिच्या या आगामी चित्रपटाबद्दल तिचे अनेक चाहते मंडळी उत्सुक आहेत.