दक्षिण सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तमिळ व मल्याळम अरुंधती नायर हिचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. १४ मार्च रोजी अभिनेत्रीचा अपघात झाला असून ती या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अरुंधतीवर सध्या उपचार सुरु असून ती त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अरुंधती व तिचा भाऊ या अपघातात जखमी झाले आहेत. १४ मार्च रोजी हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमध्ये कोवलम बायपासवर हा अपघात झाला. या अपघातात अरुंधतीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.अपघात झाला तेव्हा अरुंधती तिच्या भावाबरोबर प्रवास करत होती. रहदारी नसल्यामुळे अपघातानंतरही ते दोघे जवळपास तासभर रस्त्यावर पडून होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातामध्ये अरुंधतीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
अरुंधतीचे बहीण आरतीने आज १८ मार्च रोजी सोशल मीडिया अकाऊंवर पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिच्या बहिणीने अरुंधतीच्या अपघाताची माहिती दिली. यामध्ये आरतीनं म्हटलं की, “तामिळनाडूच्या वृत्तमाध्यमांत दाखवल्या जाणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत. हे खरं आहे की माझी बहीण अरुंधती नायरचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला आहे. तिला गंभीर दुखापत झाली आहे आणि तिला त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ती मृत्यूशी झुंज देत आहे. तसेच ती यातून लवकर बरी व्हावी यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थना व पाठिंब्याची गरज आहे”.
दरम्यान, अरुंधतीने २०१४ मध्ये ‘पोंगी एझू मनोहरा’ मधून तमिळ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. विजय अँटोनीच्या ‘सैथान’ चित्रपटामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. २०१८ मध्ये तिने ‘ओट्टाकोरू कामुकन’मधून मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ती नुकतीच २०२३ मध्ये आलेल्या ‘आईराम पोरकासुकल’ या तमिळ चित्रपटात दिसली होती.