‘सैराट’ या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. रिंकूने आजवर अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मन जिंकली. ‘सैराट’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर या अभिनेत्रींकडे अनेक चित्रपटाची ऑफर चालून आली. एकामागोमाग एक रिंकू चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर, मराठी सिनेसुष्टीसह अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटात रिंकू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचंही भरभरुन कौतुक करण्यात आलं. (Rinku Rajguru With Govinda Family)
सोशल मीडियावरही रिंकू बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. रिंकूचे फोटोशूटही तिच्या चाहत्यांना विशेष भावतात. याशिवाय रिंकू बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. काही दिवसांपूर्वीच रिंकूने सैराटमधील तिचा सहकलाकार आकाश ठोसरसह आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाला हजेरी लावली होती. आयरा खानच्या रिसेप्शन सोहळ्यातील रिंकूचा मराठमोळा लूक चाहत्यांना विशेष आवडला.

यानंतर आता रिंकूने नागभीड येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी रिंकूला पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी जमलेली पाहायला मिळाली. या कार्यक्रमादरम्यानचा एक फोटो रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदाच्या कुटुंबियांबरोबर ती पाहायला मिळत आहे.
रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा, मुलगा यशवर्धन, मुलगी टीना दिसत आहेत. गोविंदाच्या पत्नी यांनी रिंकूला घट्ट मिठी मारत हा फोटो काढलेला पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत रिंकूने, “बऱ्याच दिवसांनी भेटले” असं म्हटलं आहे. रिंकूचा गोविंदाच्या कुटुंबियांबरोबरचा हा फोटो सध्या चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. रिंकूसाठी ही गोविंदाच्या कुटुंबीयांबरोबरची भेट खास असल्याचं या फोटोवरुन कळत आहे.