Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकूने सहा वार केले होते. यामुळे अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे अनेक शस्त्रक्रिया करुन सैफला २१ जानेवारीला डिस्चार्ज देण्यात आला होता. हल्ल्याच्या रात्री सैफ रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना एका ऑटोचालकाने त्याला त्याच्या रिक्षातून हॉस्पिटलमध्ये नेले. अशा परिस्थितीत सैफने आता त्या देवमाणसाची भेट घेऊन त्याला बक्षीस दिले आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अशातच अशी बातमी आली की हॉस्पिटलमधून बाहेर येण्यापूर्वी सैफने ऑटो ड्रायव्हर भजनसिंग राणा यांची भेट घेतली, ज्याने हल्ल्याच्या रात्री त्याला हॉस्पिटलमध्ये नेले होते.
यादरम्यान अभिनेत्याने रिक्षा चालकाला मदत केल्याबद्दल आभार मानले आणि बक्षीस म्हणून ५१ हजार रुपये दिले. सैफ अली खानबरोबर त्याची आई शर्मिला टागोर यांनीही भजन सिंगचे आभार मानले आहेत. या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आता सैफ अली खानच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सैफच्या कुटुंबीयांना सुरक्षा दिली आहे. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर कुटुंबीय घाबरले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना तपास होईपर्यंत सुरक्षा कवच देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षेचा विचार करुन सुरक्षेसाठी किती पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत हे सांगण्यात आलेले नाही, तसेच सुरक्षेची श्रेणी (एक्स, वाय, झेड श्रेणी) सांगितली नाही.
आणखी वाचा – नीना कुळकर्णी झाल्या आजी, भाचीच्या चिमुकलीबरोबर खेळण्याचा आनंद, फोटो शेअर करत सांगितला अनुभव
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अभिनेत्याच्या सुरक्षेबाबत बोलले आहे. ते म्हणाले, “आम्ही आरोपींना सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे”. मुंबई पोलिसांना सैफ अली खानच्या घरी आरोपींच्या अनेक बोटांचे ठसे सापडले जे तपासात महत्त्वाची भूमिका बजावतील. इमारतीच्या पायऱ्यांवर, आतमध्ये चढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पायऱ्यांवर, घराच्या शौचालयाच्या दरवाजावर, जहांगीरच्या बेडरुमच्या दरवाजाच्या हँडलवर आरोपींच्या बोटांचे ठसे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
या जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफने आता कुटुंबासाठी पर्सनल गार्ड तैनात केले आहेत. अभिनेता रोनित रॉयने एबीपी न्यूजला सांगितले की त्याची सुरक्षा एजन्सी सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवत आहे. रोनितची ACE सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन सिक्युरिटी कंपनी चित्रपट उद्योगातील अनेक बड्या कलाकारांना खासगी सुरक्षा सेवा पुरवते. सैफला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रोनित रॉय स्वतः आधी हॉस्पिटलमध्ये गेला आणि नंतर सैफच्या घरी, सतगुरु शरण अपार्टमेंटमध्येही आला.