गेले काही दिवस मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांवर भीतीचे सावट असल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर झालेला हल्ला, त्यानंतर शाहरुख खानला आलेले निनावी फोनकॉल, काही कालाकारांचे अपहरण आणि त्यात नुकताच सैफ अली खानवर झालेला प्राणघातक हल्ला. या सगळ्यामुळे कलाकार मंडळींचा जीवद धोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील तीन बड्या कलाकारांना पाकिस्तानमधून धमकीचा मेल आला आहे. राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांना ही धमकी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. (Rajpal Yadav Remo D’Souza and Sugandha Mishra death threat)
याबाबत मुंबई पोलिसांनी राजपाल यादव यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांना टीव्ही अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि कोरिओग्राफर रेमो यांचीही तक्रार आली आहे. ईमेल करणाऱ्याने ईमेलच्या शेवटी ‘बिष्णू’ लिहिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. असा दावा केला जात आहे की प्राथमिक तपासात ईमेल करणाऱ्याने पाकिस्तानमधून ईमेल पाठवला होता आणि आता याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या कथित ई-मेलमध्ये राजपाल यादव, रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांच्यावर लक्ष ठेवण्याचा दावा करण्यात आला आहे.
आणखी वाचा – नीना कुळकर्णी झाल्या आजी, भाचीच्या चिमुकलीबरोबर खेळण्याचा आनंद, फोटो शेअर करत सांगितला अनुभव
मेलमध्ये लिहिले आहे की, “आम्ही तुमच्या अलीकडील कृतींवर नजर ठेवत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. हा सार्वजनिक स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, हा संदेश अतिशय गांभीर्याने घ्या आणि गोपनीयता राखा”. तसेच पुढे जर मेल पाठवण्याऱ्या व्यक्तीची विनंती स्वीकारली नाही तर राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूजा यांना धोकादायक परिणामांना सामोरे जावे लागणार असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच त्या निनावी व्यक्तीने सर्व कलाकारांकडून आठ तासांत उत्तर मागितले आहे.
याबद्दल त्याने पुढे असं म्हटलं आहे की, “जर तुम्ही असे केले नाही तर त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात ज्याचा तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. आम्ही पुढील आठ तासांत तुमच्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा करतो. आम्हाला प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचे आम्ही गृहीत धरू आणि आवश्यक ती कारवाई करु”. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करत असू शकते याबद्दल पुढे काय चौकशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.