सुप्रसिद्ध अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ऋषभचं नशिबच बदललं. चित्रपटाची लोकप्रियता पाहता ‘कांतारा’च्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. ‘कांतारा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरु आहे. मात्र आता यासंदर्भात एक निराशाजनक माहिती समोर आली आहे. ‘कांतारा २’मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपटाच्या संपूर्ण टीमलाही मोठा धक्का बसला आहे. पण चित्रीकरण सुरु असताना ही घटना घडली कशी?, नक्की काय प्रकार आहे? हे आता समोर आलं आहे. (Kantara 2 actor death)
वाईट काळ आला अन्…
‘कांतारा २’मध्ये अभिनेता एमएफ कपिल (३३ वर्षीय) ज्युनिअर कलाकार म्हणून काम करत होता. तो चित्रपटाच्या चित्रीकरणामध्येच व्यग्र होता. मंगळवारी (६ मे) दुपारी लंचब्रेकमध्ये तो नदीमध्ये पोहण्यासाठी गेला. कोल्लूर सौपर्णिका नदीमध्ये तो पोहायला गेला. मात्र पोहताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने कपिल बुडाला. ही बातमी लगेचच वाऱ्यासारखी पसरली. कपिलबाबत ऐकल्यानंतर चित्रपटाच्या टीमलाही मोठा धक्का बसला.
आणखी वाचा – “देशात काय चाललंय भान ठेवा”, नारकर कपलच्या डान्सवर नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या म्हणाल्या, “तुम्ही भारतीय ना…”
कोल्लूरच्या स्थानिक प्रशासनाने नदीमध्ये शोधकार्य सुरु केलं. मंगळवारी संध्याकाळीच त्याचा मृतदेह हाती लागला. कपिलच्या निधनानंतर पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली. आता पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर ‘कांतारा २’च्या चित्रीकरणाला मोठं गालबोट लागलं आहे. यापूर्वीही ‘कांतारा २’च्या टीमबाबत दुर्घटना घडली होती. एकापाठोपाठ एक चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये विघ्न येत आहेत.
काही महिन्यांपूर्वी ‘कांतारा २’साठी कोल्लुरमध्ये ज्युनिअर कलाकारांना एक बस घेऊन जात होती. मात्र ही बस रस्त्यातच पलटली. या घटनेमध्ये कोणालाच दुखापत झाली नसल्याचं वृत्त समोर आलं होतं. या घटनांची मालिका इथेच थांबली नाही. ‘कांतारा २’च्या टीमला आणखी एख मोठा धक्का बसला होता. काही महिन्यांपूर्वी वारा व अति पावसामुळे ‘कांतारा २’चा महागडा सेट कोसळला होता. यामुळे बरंच नुकसान झालं होतं. शिवाय इतर काही अडचणींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर गेली. आता ज्युनिअर आर्टिस्टच्या निधनानंतर ‘कांतारा २’चं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.