Sharad Upadhye On Nilesh Sable : बरेच दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र हा शो एक वेगळंच वळण घेताना दिसणार असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, याशोमध्ये डॉ. निलेश साबळे नसणार असल्याचं समोर आलं, आणि या बातमीला उधाण आलेलं पाहायला मिळालं. तर एकीकडे अभिनेता अभिजीत खांडकेकर या शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच निलेश साबळेंच्या विरोधात जात सुप्रसिद्ध राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. निलेश साबळेंना थेट टोला लगावत शरद यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, “आदरणीय नीलेशजी साबळे, आपल्याला ‘चला हवा येऊ द्या’च्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्याजागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली.वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते.त्याप्रमाणे मी ११ वाजता पोहोचलो पण तीन वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिका संपणार?, विलास केस मर्डरबाबत सायलीचा मोठा खुलासा, म्हणाली, “शेवटचे दिवस…”
पुढे त्यांनी म्हटलं, “नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होता पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वाजता. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला सहा वाजता बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मध्येमध्ये बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुसऱ्यांच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो”.
शेवटी त्यांनी लिहिलं, “स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही.आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा, सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करुन कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा.आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती”.





